
स्वामी गगनगिरी महाराजांचे खोपोली आश्रमातील सिद्ध पर्णकुटीवर पंच सुवर्णकलशारोहण सोहळा संपन्न!!!
- by Reporter
- May 16, 2022
- 946 views
खोपोली : विश्वविख्यात योगीराज श्रीनाथ गगनगिरी महाराज यांचे पवित्र वास्तव्याने व अखंड जप-तप-साधनेने पावन झालेल्या सिद्धपर्णकुटीवर पंचसुवर्ण कलशाची मंगलमय स्थापना सोहळा नुकताच हजारो भाविक भक्तांच्या चैतन्यदायी उपस्थितीत व साधू संतांच्या मंगलमय आशीर्वादाने संपन्न झाला.
सर्वप्रथम पंचसुवर्ण कलशाची भव्य शाही मिरवणूक काढण्यात काढण्यात आली, तदनंतर भजन, कलशपूजन व इतर धार्मिक विधी यथासांग पार पडल्यावर स्वामी गगनगिरी महाराजांच्या जयजयकारात, टाळ मृदूंगाच्या साथीने, तुतारीच्या ललकारीत, ढोलताशांच्या नाद गजरात सदर दिव्य सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी नाणिजचे श्री नरेंद्राचार्यजी महाराज, परमपूज्य गुरुवर्य श्री. जंगलीदास महाराज, बालयोगी श्री. सदानंद महाराज, श्री. आबानंद गिरीजी महाराज, श्री. उल्हासगिरी महाराज, तसेच विविध आश्रमांचे मठाधीपती, पदाधिकारी, संत महंत महात्मे, विविध स्तरातील मान्यवर व महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले गगनगिरी महाराजांची भक्तमंडळी यांनी संपूर्ण आश्रम परिसर गजबजून गेला होता. संपूर्ण आश्रम परिसर विविध फुलांच्या भव्य माळा सोडून व आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता.
सर्व मानवजातीला नीतिमूल्यांची व मानवतेची शिकवण देणाऱ्या स्वामी गगनगिरी महाराजांच्या सिद्ध पर्णकुटीवर सुवर्णकलश स्थापनेचा मंगलमय सोहळा अतीव श्रद्धा, भक्तिभावाने व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
रिपोर्टर