अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या विकासाचा ध्यास बाळगला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे राजकीय साधनसूचिता बाळगणारे नेते होते. त्यांनी कायमच देशाच्या विकासाचा ध्यास बाळगला. विविध प्रकारच्या विचारधारांचे कायमच स्वागत करत त्यांनी लोकशाहीला एक प्रकारची उंची गाठून देण्याचे काम केले. त्यामुळे अटलजींना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना व्यक्त केले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी मंत्री आनंदराव नारायण देवकाते, माजी राज्यमंत्री वसंतराव रामराव धोत्रे, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधानसभा सदस्य कॉम्रेड माधवराव बयाजी गायकवाड तसेच विधानसभा सदस्य केशवराव आत्माराम पारधी, वासुदेव आनंदराव देशमुख, शिवाजीराव नारायणराव नागवडे, वैजनाथराव यादवराव आकात, यादवराव कृष्णराव भोयर, लक्ष्मणराव विठोबा जाधव, वसंतराव विठोबा थोरात, विठ्ठलराव सहादू भैलुमे, वसंतराव बालाजीपंत इटकेलवार आणि विमल खंडेराव रांगणेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत शोक प्रस्ताव मांडला. त्यावेळी ते बोलत होते.

अर्थकारण, परराष्ट्र धोरण, शेती, समाजकारण, राजकारण, संरक्षण, धर्म, अध्यात्म आदी विविध क्षेत्रात अटलजींनी मांडलेले विचार पथदर्शी व कालातीत ठरले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, संवेदनशील हृदयाचे अटलजी प्रसंगी देशहितासाठी कठोर झाल्याचेही दिसून आले. साहित्य, काव्य आदी क्षेत्रातही त्यांनी भव्य कामगिरी केली. 1996 साली विश्वासदर्शक ठरावावर बोलताना त्यांनी मांडलेला सरकारें आयेंगी, सरकारें जायेंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी, लेकिन देश का लोकतंत्र जिंदा रहना चाहिए. भारत का लोकतंत्र अमर रहना चाहिए हे त्यांचे मत विचारांची उंची दर्शविते.

मुख्यमंत्री म्हणाले, शेजारील राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध असावेत ही त्यांची भूमिका होती. त्याप्रमाणे पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मात्र, पुढे कारगील मध्ये  पाकिस्तानने घुसखोरी केल्यानंतर कठोर भूमिका घेतली व त्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी छोटे मन से कोई बडा नही होता और टूटे मन से कोई खडा नही होता,’ ‘गीत नया गाता हॅूं,’ ‘मौत से ठण गई, जॅूंजने का मेरा इरादा न थाआदी अटलजींच्या साहित्यातील व कवितांतील अनेक ओळी उद्धृत केल्या.

शोकप्रस्तावावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विचार व्यक्त केले. तसेच शोकप्रस्ताव संमत झाल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते,सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सदस्य सर्वश्री अजित पवार, गणपतराव देशमुख, छगन भुजबळ, अबू आझमी, पंकज भुजबळ, श्रीमती दिपीका चव्हाण यांनीही शोकप्रस्तावावर विचार व्यक्त केले.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट