अंधेरी तहसिल कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मच्छीमारांचा मोर्चा

मुंबई  : मच्छीमारांना मिळणारे डिझेल तब्बल ३० रुपयांनी महाग झाले आहे. म्हणजे १२३ रुपये प्रती लिटर जवळ पोहचले आहे .त्यामुळे मच्छीमारी व्यवसाय धोक्यात आला आहे.वेसावेत ३०० ते ३५० यांञिक बोटी पैकी जवळपास ८० ते १०० बोटी कार्यरत आहेत.मागील ३ ते ४ वर्षे नैसर्गिक आपत्ती,वादळे आली अश्यातच अनेक मासेमारी नौका बंद झाल्या आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार मच्छीमारांच्या प्रश्नावर गंभीर नाही. त्याचा फटका मच्छीमारांना बसत आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वेसावे व परिसरातील मच्छीमारांनी गुरुवारी अंधेरी तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या धडक मोर्चात पारंपरिक वेषात मच्छीमार व कोळी महिला सहभागी झाल्या होत्या.

वेसावे कोळी जमात, नाखवा मंडळ व मच्छीमार सहकारी संस्था, मिनी टॉलर्स यांच्या विद्यमाने हा मोर्चा आयोजित केला होता, अशी माहिती मच्छीमार नेते प्रदिप टपके यांनी दिली.

वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे, कार्याध्यक्ष पृथ्वीराज चंदी, मच्छीमार नेते प्रदीप टपके, पराग भावे, जयराज चंदी, राजश्री भानजी, जयनंदा भावे, जागृती भानजी, राजहंस टपके, रणजीत काळे यांची समयोचित भाषणे झाली. डिझेल भाव वाढीतील तफावत कमी करावी, सवलती दरात मच्छीमारांना डिझेल मिळावे, राज्य सरकारने मच्छीमारांचे थकित डिझेल परतावे तातडीने द्यावेत, एलईडी पद्धतीने होणारी मासेमारी बंद करावी, १२० अश्वशक्तीवरील मच्छीमार नौकांना डिझेल पुरवठा करावा, कोळीवाडे संरक्षित करावेत, इत्यादी प्रमुख मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे अंधेरी तहसीलदारांना दिले.

संबंधित पोस्ट