
पालिकेत पत्र स्वीकारण्याची वेळ आता ५ वाजेपर्यंत
- by Reporter
- Mar 05, 2022
- 345 views
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागात आता पत्र स्वीकारण्याची वेळ ही आता ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. यापूर्वी ही वेळ ४:३० वाजेपर्यंत होती.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी वेळ वाढविण्याची मागणी आयुक्त इकबाल सिंह चहल यांसकडे केली होती. पत्रात नमूद करण्यात आले होते की पालिका मुख्यालय आणि अन्य आस्थापनेमध्ये पत्र घेण्याची वेळ ही वाढविण्यात यावी.
बृहन्मुंबई महानगरपालिकातर्फे आता सोमवार ते शुक्रवार असे कार्यालयीन कामकाज असते. शनिवारी सुट्टी असल्याने आता सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. पण पत्र स्वीकार करण्याची वेळ ही सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत असून त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. यामुळे पत्र स्वीकार करण्याची वेळ ही सायंकाळी ६ वाजेपर्यंत केल्यास नागरिकांना होणारा त्रास व मन:स्ताप वाचेल.
बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुख कर्मचारी अधिकारी संध्या व्हटकर यांनी अनिल गलगली यांस कळविले की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालयातील आवक जावक उपविभागात नागरिकांकडून येणारी पत्रे, तक्रारी, निवेदने इत्यादी कागदपत्रे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्विकारावीत व तसा फलक नागरिकांना स्पष्ट दिसेल असा कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात यावा असे निर्देश सर्व खातेप्रमुख/ सहायक आयुक्त यांना देण्यात आलेले आहेत.
रिपोर्टर