मूकनायक ते प्रबुद्ध भारत - दुर्लक्षित पत्रकार

विश्वभूषण हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वैश्विक नाव असून संपूर्ण जगात प्रामुख्याने त्यांची ओळख आहे ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून इथे विविध धर्म जाती त्यांच्या नानाविध भाषा रुढी परंपरा असूनही सर्वांना आपापली संस्कृती पालन करण्याचे मुक्त स्वातंत्र्य बहाल करण्याबरोबरच राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेचा आदर करण्याची जबाबदारी बरोबरच आपले हक्क आणि अधिकाराची हमी देणारे स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या न्याय तत्वावर आधारित  जगातील एक आदर्शवत राज्यघटना बाबासाहेबांनी निर्माण केल्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून गौरविले जात असले तरी जगात जितकी म्हणून शास्त्र आहेत त्या सर्वांचाच सखोल अभ्यास केला असल्यामुळे त्यांना केवळ अष्टपैलू म्हणणे देखील त्यांच्या प्रकांड पांडित्याला कमी लेखण्यासारखे ठरणार आहे.कुणी त्यांना कायदेपंडित म्हणतात तर कुणी अर्थतज्ञ तर कुणी मानवतेचा मुक्तीदाता.धर्मशास्त्राचे अभ्यासक, अर्थशास्त्राचे अभ्यासक, कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक द्रष्टे विचारवंत विविध सामाजिक चळवळींचे जनक अशा अनेक विद्या पारंगत. असल्याने अनेक अंगांनी  अनेक विशेष नावाने ते जगाला परिचित  असले तरी एक आचार्य अत्रे सोडले तर पत्रकारिता क्षेत्रातील तज्ज्ञांनी, विषमता मूलक विचारसरणी आणि पारंपरिक विषमतावादी मानसिकतेमुळे इथल्या समाज व्यवस्थेने निर्माण केलेल्या. मानसिकतेने बाबासाहेबांच्या पत्रकारितेची दखलच घेतली नाही. त्यांच्या पत्रकारितेकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला गेला आहे. इथल्या विषमतावादी  दृष्टचक्रातून अस्पृश्यां सहीत पिचत पडलेल्या इतर तमाम बहुजन वर्गाला आणि समस्त महिला वर्गाला बाहेर काढण्यासाठी त्यांच्या व्यथा जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी‌ बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांच्या उन्नतीची  दिशा ठरविण्यासाठी जाहीर चर्चा करण्यास  वृत्तपत्रासारखे अन्य माध्यम आणि साधन नाही. तेव्हां समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी आपल्याजवळही एखादे प्रभावी साधन असावे,आपले हक्काचे वृत्तपत्र असावे हे त्यांना तीव्रपणे जाणवले कारण त्याकाळी प्रकाशित होणारी जी काही  वृत्तपत्रे उपलब्ध होती ती सर्व विशिष्ट जातींंच्या वर्चस्वाची जपणूक करत अशा जाती समुहाचे  हितसंबंध पाहणारी होती.त्यांना अश्पृश्य आणि बहुजनांच्या  हिताची पर्वा  करणे शक्यच नव्हते.ती उघडपणे अस्पृश्यांवर आणि कूट रितीने बहुजनांवर  अन्यायच करणारी होती. या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी प्रकाशन माध्यमाच्या गरजेतून एक निश्चित भुमिका घेऊन बाबासाहेब पत्रकारितेकडे वळले.

वास्तविक डॉ. बाबासाहेबांची  समाजाप्रती पर्यायाने राप्ट्राविबयी कळळीची जातीवंत  पत्रकारिता जाणूनच घ्यायची तर त्यांची 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत' ही पत्रे त्यासाठी आधारभूत आहेत. या पत्रांमधून डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे समग्र दर्शन घडते.
तसे बाबासाहेबांनी मूकनायक,बहिष्कृत भारत,जनता आणि प्रबुद्ध भारत ही पाक्षिके चालविली. 'जनता' आणि 'प्रबुद्ध भारत' यांची आपल्या चळवळीची मुखपत्रे म्हणून ओळख असावी अशी मनिषा होती.ते स्वतः अतिशय व्यस्त असल्यामुळे त्यांचे संपादन बाबासाहेबांनी आपल्या सहकार्‍यांकडून करून घेतले. मूकनायक'आणि 'बहिष्कृत भारत' या  पत्रांचे संपादन मात्र त्यांनी स्वत:च केले. संपादनास मदत करणारा दुय्यम संपादक ठेवण्याइतपत आर्थिक संपन्नता नसल्याने तसेच
स्वार्थ्यत्यागून विनामोबदला संपादन  करण्यास मागासवर्गीयांमधूनही कुणी पुढे यायला  तयार झाला नाही.
अशा स्थितीतही त्यांनी बहिष्कृत भारताचे २४-२४ कॉलम लिहून काढण्याची सारी जबाबदारी संपादक म्हणून एकट्या बाबासाहेबांना घ्यावी लागली संपादन करताना त्यातील शब्द न शब्द बाबासाहेबानी स्वत: लिहून ही पुन्हा पुन्हा तपासून पहात असत.इतके ते आपल्या लेखणीविषयी दक्ष असत.
बहिष्कृत भारताच्या जळजळीत. वास्तवास समजून घेण्याची क्षमता,अथवा सार्वजनिक कार्याविषयी कळकळ वाटली नसल्यामुळे असावे
तत्कालीन
लोकांचा त्या कार्यास हवा तितका पाठिंबा मिळाला नाही.
 31 जानेवारी 1920 रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या आर्थिक पाठबळाने त्यांनी'मूकनायक' या पाक्षिकाची सुरुवात केली 'मूकनायक' हे नाव त्यांना ''नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण'' या चरणावरुन सुचले होते.
मूकनायक'च्या सुरवातीच्या या ओळीतूनच त्यांची भूमिका स्पष्ट होते.
पहिल्याच अंकाच्या संपादकीयामध्ये  ही 'जन्मप्रतिज्ञा' आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली .'मूकनायक हे
पुढील धगधगत्या चळवळीची जणू नांदीच ठरली असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
 'मूकनायकने' त्याकाळी इथल्या व्यवस्थेने हजारो वर्षांपासून आवाज दाबून टाकलेल्या समाजाला सर्वार्थाने वाणी असूनही वाचा नसलेल्या मुक्या असलेल्या समाजाला खर्‍या अर्थाने नवा आवाज दिला.
त्यांच्या पत्रकारितेने  त्या क्षेत्रात एक  नवा आदर्श निर्माण केला. बाबासाहेब उच्चशिक्षणासाठी विलायतेला गेले आणि 1923 मध्ये 'मूकनायक' बंद पडले
कोणत्याही चळवळीत वृत्तपत्राचे योगदान काय असते, याची बाबासाहेबांना पूर्ण जाणीव होती. म्हणून पुन्हा जुळवाजुळव करून 'बहिष्कृत भारत'च्या रूपाने त्यांचे नवे पाक्षिक उदयाला आले. तो दिवस होता 3 एप्रिल 1927. या पाक्षिकाच्या मांडणीतून बाबासाहेबांची पत्रकारिता सर्वार्थाने अगदीच प्रगल्भ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रातील मजकूर, मांडणी, सदरे अगदीच अप्रतिम होती. या पाक्षिकामध्ये मुख्यत: 'आजकालचे प्रश्न' नावाने चालू घडामोडींविषयीचे सदर, अग्रलेख, 'आत्मवृत्त', 'विचार-विनिमय', 'वर्तमान सार' याबरोबरच 'विविध विचारसंग्रह' अशी अनेक सदरे नियमितपणे सुरू होती.
'बहिष्कृत भारत' सुरू झाले त्याचवेळी महाड येथील धर्मसंगरालाही सुरवात झालेली होती. त्यामुळेच या काळात या पत्राने चळवळीसाठी अतिशय अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात मोलाची भर घातल्याचे दिसून येते. या पत्रातूनदेखील बाबासाहेबांचे भाषा वैभव अत्यंत खुलून दिसते. उदाहरण म्हणून लोकभाषेत त्यांनी दिलेली काही लेखांची शीर्षके पाहता येतील. 'आरसा आहे, नाक असेल तर तोंड पाहून घ्या!', 'खोट्याच्या साक्षीने खरे सिद्ध होते काय?', 'आपलेपणाची साक्ष दे, नाहीतर पाणी सोड', 'गुण श्रेष्ठ की जात श्रेष्ठ', 'बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक ऋण नव्हे काय?', 'खरे बोल निश्चयात आहे, समुच्चयात नाही' अशा प्रकारच्या लेखांमधून बहिष्कृत भारताने अक्षरश: रान पेटवले.
बहिष्कृत भारतच्या पहिल्या अंकात बाबासाहेब म्हणतात,
सुधारणेचा कायदा अंमलात आला आहे. इंग्रजांच्या हातची सत्ता काही प्रमाणात विशिष्ट आणि वरिष्ठ लोकांच्या हाती गेली आहे. बहिष्कृत वर्गाची प्रतिनिधीच्या बाबतीत मुळीच दाद व दखल न घेता ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला त्याचा निर्दयी धनी कसाबाच्या स्वाधीन करतो, त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गाच्या लोकांना त्यांच्या मायबाप सरकारने त्या विशिष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे.जवळपास नव्वद वर्षांच्या काळ लोटला असला तरी कागदोपत्री अस्पृश्यता संपली असली तरी वास्तवात ती अजूनही पाळली जाते.अशा लोकांची
 स्थिती आजही अधिक  शोचनीय झाली आहे.ही स्थिती जर गाडायची असेल तर सध्या घडत असलेल्या अन्याय व जुलुमावर प्रकाशझोत टाकण्यासाठी बाबासाहेबांच्या तत्वानुसार चालणा-या
वृत्तपत्राची आवश्यकता पूर्वी पेक्षा आज अधिक आहे.असो !
या पाक्षिकाचे  बाबासाहेब स्वत: संपादक होते. 
या वृत्तपत्रातील सर्व मजकूर ते स्वत: लिहित असत. आर्थिक अडचणींमुळे पुरेसे  वर्गणीदार झाले नाहीत त्यामुळे कायमची आर्थिक तरतूद करणे बाबासाहेबांना शक्य झाले नाही. या सर्व व्यापातापामुळे अखेर बहिष्कृत भारत 15 नोव्हेंबर, 1929 रोजी बंद पडले. या पाक्षिकाचे एकूण 34 अंक निघाले. त्यातला 04 जानेवारी 1929 चा अंक सोडता सर्व अंकात अग्रलेख आहेत. 31 अंकांमध्ये आजकालचे प्रश्न ''प्रासंगिक विचार'' या सदरामध्ये त्यांनी स्फूट लेख लिहिले आहे. त्यांच्या स्फूट लेखाची संख्या 145 आहे.
अशा स्फुटलेखनात लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे, त्यांच्या जीवनदृष्टीचे, त्याच्या चिकित्सकतेचे आणि त्यांच्या विचार वैशिष्ट्याचे प्रतिबिंब उमटत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्फूट लेखन प्राधान्याने 'बहिष्कृत भारतात' आढळते. 'बहिष्कृत भारताच्या 1927 सालच्या पहिल्या वर्षाच्या अंकात ''आजकालचे प्रश्न'' या सदरांतर्गत तर दुसऱ्या वर्षी 'प्रासंगिक विचार' या सदराखाली त्यांचे स्फूटलेखन प्रकाशित झाले आहे. विषयांचे वैविध्य हे त्यांच्या लिखाणातील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय.त्यांनी बालविवाहाचे फलित, ब्राम्हण्याचे स्वरुप, वर्णाश्रमाचा प्रभाव, मंदिर प्रवेश, मातंग समाज, शुद्धिकार्य, सत्याग्रह, आर्यसमाजाचे कार्य, मनुस्मृती दहनाचे वादळ, सत्यशोधक चळवळीचा ध्येयवाद, सहभोजन, मजूर पक्ष, मिश्रविवाह, हिंदीकरण, देव, पुजारी व भक्त क्रांती, रोटी व्यवहार व बेटी व्यवहार, भिन्न वसाहती, व्यक्ती, सायमन कमिशन इत्यादी अशा अनेक विषयावर लेखन केले.
साधारणतः वर्षभरातच म्हणजे 24 नोव्हेंबर 1930 ला 'जनता' वृत्तपत्राचा प्रथम अंक 
प्रकाशित झाला. संपादक श्री. देवराव विष्णू नाईक होते. जनता प्रारंभी पाक्षिक होते. 31 ऑक्टोबर 1931 रोजी ते साप्ताहिक झाले.या वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ''गुलामाला तू गुलाम आहेस याची जाणीव करून द्या. म्हणजे तो बंड करुन उठेल'' हे वाक्य होते. जनता मध्ये त्यांनी सर्व निकडीचे प्रश्न तर चर्चिले पण विशेष म्हणजे बाळासाहेबांनी  विलायतेहून लिहून पाठविलेली सर्व पत्रे जनता मध्ये प्रकाशित झाली. 1955 पर्यंत जनता सुरु होते. या वृत्तपत्राचे संपादक वेळोवेळी बदलले. कधी त्यात अनियमितपणा निर्माण झाली पण तरीही ते खूप दिवस टिकले. 4 फेब्रुवारी 1956 रोजी जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले. आणि बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर 1961 साली प्रबुद्ध भारत बंद पडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वृत्तपत्रातून कोल्हापूर जवळील माणगाव परिषद जिथे राजर्षि शाहू महाराजांनी या परिषदेत डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाचे स्वागत करुन त्यांच्याकडून या समस्यांना गती मिळेल असे अभिवचन दिले. महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रह केला आणि त्याचे वर्तमान त्यांच्या बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात आले.
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा देखील एक महत्त्वाचा टप्पा होता. या चळवळीचे प्रतिबिंब सुद्धा डॉ. आंबेडकरांच्या वृत्तपत्रातून उमटले आहे. अशा अनेक चळवळी त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून चालविल्या. तरिही एक
पत्रकार म्हणून अद्यापही वृत्तपत्रसृष्टीने बाबासाहेबांची म्हणावी तेवढी दखल घेतल्याचे दिसून येत नाही.
त्याकाळी वरवर बोलघेवडेपणाने अस्पृश्यता निवारण्यासाठी सल्ला देणारी काही राष्ट्रीय स्वरूपाची वृत्तपत्रे होती. मात्र, प्रत्यक्ष त्या कार्याला वाहून घेणारे  'बहिष्कृत भारत' हे एकमेव होते. म्हणूनच पत्रकार म्हणून बाबासाहेबांना त्याकाळी प्रस्थापित  पत्रकारांशी देखील ‍तेवढ्याच निकराने झुंज द्यावी लागली, याची प्रचीती ही पत्रे वाचताना येते.  टीकाकारांपुढे बाबासाहेब कधीही झुकले नाही,उलट आपल्या विद्वत्तेने, वाकचातुर्याने आणि हजरजबाबी स्वभावाने त्यांनी त्यांच्या टीकाकारांना नामोहरम केले.तरिही एक पत्रकार म्हणून अद्यापही वृत्तपत्रसृष्टीने बाबासाहेबांची म्हणावी तेवढी दखल घेतल्याचे दिसून येत नाही.
एकूणच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही त्यावेळच्या इतर पत्रकारांपेक्षा अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणारी म्हणूनच भिन्न स्वरूपाची होती. त्यांना एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढावे लागत होते. अशिक्षित, दारिद्रयाने पिचलेल्या समाजाचे नेतृत्व करायचे, त्यात वृत्तपत्र स्वत:च्या आर्थिक पायावर भक्कमपणे उभे नसलेले. अशी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही वृत्तपत्रासाठी केवळ बातम्या किंवा लेख लिहून रकानेच्या रकाने भरण्याचा धंदा त्यांनी कधीही केला नही. तर त्यातला प्रत्येक शब्द तोलून मापून लोकांपर्यंत जाईल, यासाठी ते सतत दक्ष राहिले.सध्याच्या पत्रकारितेने डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. 
आजच्या परिस्थितीत सर्व प्रकारची साधन सामग्री, तंत्रज्ञान उपलब्ध असूनसुद्धा कोणत्याही वृत्तपत्राचा मालक, संपादक जनतेच्या मनावर कायमची पकड घेऊ शकत नाही. याची कारणे अनेक असली तरी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आजच्या वृत्तपत्रांची समाजाशीच फारकत झालेली आहे.
 अनेक सामाजिक विषयावर निकराची लढाई देण्याची आवश्यकता असल्यामुळे
 आजच्या पत्रकारिता विश्वाला बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता अभ्यासण्याची नितांत आवश्यकता आहे. बाबासाहेब हे एकाच वेळी वृत्तपत्राचे संपादक होते, त्याचवेळी ते कोट्यावधी जनेतेचे नेते होते. कारण त्यांनी कधीही व्यावसायिक तडजोड केली नाही. म्हणूनच आजही पत्रकार म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची कारकीर्द अंतर्मुख व्हायला भाग पाडते सध्याच्या पत्रकारितेने बाबासाहेबांच्या  पत्रकारितेकडून अशा खूप काही गोष्टी शिकण्यासारखे आहे.
म्हणूनच आजही पत्रकार म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची कारकीर्द अंतर्मुख व्हायला भाग पाडते.
आजच्या पत्रकारिता विश्वाला बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता अभ्यासण्याची नितांत आवश्यकता आहे. इतकेच !
पत्रमहर्षी विश्वभुषण बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी  विनम्र अभिवादन !

रिपोर्टर

संबंधित पोस्ट