लसीचे दोन्ही डोस न घेता फिरत असाल ? मग थांबा... अन्यथा १० हजारांचा दंड भरावा लागणार; मुंबई पालिकेचा निर्णय

मुंबई :  नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. मुंबईतील मॉल, रेस्टॉरंट, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक येथे लसीचे दोन डोस असणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. जर या ठिकाणी कोरोना लसीचे दोन डोस न घेतलेली व्यक्ती आढळल्यास त्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात येणार आहे. मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे. 

दक्षिण अफ्रिकेतून मुंबईत आलेल्या १ हजार १२६  प्रवाशांचा शोध सुरु असून त्यांची कोविड टेस्ट केली जाणार आहे. दरम्यान, यांना ट्रॅक केल्यानंतर त्यांची कोविड टेस्ट करुन पॉझिटीव्ह आढळल्यास जीनोम सिक्वेंसिंगही केलं जाणार आहे. तसंच दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या विमानांबाबत निर्णय घेऊन संस्थात्मक विलगीकरणाची नवी पॉलिसी केंद्रानं बनवावी अशी विनंतीही केंद्राकडे केल्याची माहिती पालिका आयुक्त चहल यांनी दिली.

दुसऱ्या डोसची मुदत उलटून गेल्यानंतरही ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांच्यासाठी लसीकरण मोहिम वेगानं राबवलं जाणार आहे. तसंच मुंबईसाठी विशेष बदल म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतरही कमी करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान, आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता १४ दिवस क्वॉरंटाईन केलं जाणार असून त्यांची दर ४८ तासांनी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर मुंबई विमानतळावर बंदी घालण्याची मागणी आज केंद्र सरकारकडे राज्याने केली आहे. 

संबंधित पोस्ट