मेजर पोर्ट कायद्याविरोधात १५ डिसेंबर पासून बंदर व गोदी कामगारांचा देशव्यापी संप
- by Reporter
- Nov 30, 2021
- 275 views
मुंबई : भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांसाठी ३ नोव्हेंबर २०२१ पासून " मेजर पोर्ट ऑथोरिटी ॲक्ट २०२१" लागू झाला असून, केंद्र सरकारच्या या कामगार विरोधी धोरणानुसार भविष्यात प्रमुख बंदरांचे खाजगीकरण होऊ शकते. न्यू मंगलोर येथे १३ व १४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाचही मान्यताप्राप्त बंदर व गोदी कामगार महासंघाची मिटिंग होऊन त्यामध्ये घेतलेल्या निर्णयानुसार १५ डिसेंबर २०२१ पासून किंवा त्यानंतर बंदर व गोदी कामगार केव्हाही बेमुदत संपावर जातील. असा स्पष्ट इशारा सभेचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन ( वर्कर्स ) चे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये यांनी केंद्र सरकारला दिला.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल मध्ये गोदी कामगारांची जाहीर सभा झाली.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, " मेजर पोर्ट ॲक्ट १९६३ " हा चांगला कायदा असतांना देखील " मेजर पोर्ट ऑथोरिटी ॲक्ट २०२१" हा कायदा आणण्याची काही गरज नव्हती. हा कायदा अमलात आणण्यापूर्वी कोणतेही नियम बनविले नसून, कोणत्याही युनियनला व फेडरेशनला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे भविष्यात प्रमुख बंदरांचे खाजगीकरण होऊन गोदी कामगारांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. वडाळा येथील पोर्ट ट्रस्टच्या १० एकर जागेवर खाजगी तत्वावर डी. वाय. पाटील ६९३ कोटींचा प्रकल्प करणार होते, मात्र या रकमेपैकी फक्त ३४ कोटी ६५ लाख व त्यानंतर २० कोटी भरणाऱ्या डी. वाय. पाटीलने कोणत्याही नियमांचे व अटींचे पालन न केल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुंबई पोर्ट ट्रस्टचे हॉस्पिटल डी. वाय. पाटील यांना देऊ नये.
ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त केरशी पारेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात हॉस्पिटलच्या खाजगिकरणा विरोधात सविस्तर माहिती देऊन डी. वाय. पाटीलने करारानुसार कोणतेही नियम व अटी न पाळल्यामुळे दोन्ही युनियनने मुंबई उच्च न्यायालयात केस दाखल करून स्थगिती घेतली आहे, हा कामगारांचा फार मोठा विजय आहे. कामगार हितासाठी आम्ही दोन्ही युनियनच्या वतीने शेवटपर्यंत लढा देऊ. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी निवृत्ती धुमाळ यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.
सभेचे सूत्रसंचालन ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी राकेश पांडे यांनी केले तर आभार मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षा शीला भगत यांनी मानले.
सभेला मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी सर्वश्री. विजय रणदिवे, दत्ता खेसे, निसार युनूस, संदीप कदम, विकास नलावडे, मारुती विश्वासराव, मनीष पाटील , विष्णू पोळ व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी सर्वश्री. राजाराम शिंदे, बबन मेटे, कल्पना देसाई, विनोद पितळे, दत्तू फडतरे, फिलिप्स तसेच कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर