कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात खळबळ
- by Reporter
- Nov 27, 2021
- 411 views
मुंबई :कोरोनाच्या नव्या वेरियंटने जगभरात खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश सतर्क झाले असून कोरोनाच्या या नव्या वेरियंटचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही सतर्क झाले असून विषाणूच्या या नव्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.आघाडी सरकारकडून दक्षिण आफ्रिकेतून सुरू असणाऱ्या विमान सेवेवर बंदी घालण्याचा विचार महाराष्ट्र सरकारकडून सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला होता. आफ्रिका खंडातील इतर देशांमध्येही कोरोनाच्या या नव्या विषाणूचा संसर्ग फैलावला आहे. बोत्सवानामध्ये या नव्या व्हेरियंटचे ३२ म्युटेशन आढळले आहेत. हा व्हेरिएंट अधिक वेगाने फैलावत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतील विमान उड्डाणांवर बंदी घालण्याचा केंद्र आणि राज्य सरकार विचार करत आहे. तर, येत्या ३ डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावरही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या कसोटी सामन्यात ५० प्रेक्षक क्षमता केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नवीन कोरोना व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा भितीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालेय. नव्या व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेय. हा धोका लक्षात घेता अमेरिकासह अनेक देशांनी प्रवासावरील निर्बंध वाढवले आहेत. याबाबत भारत सरकारही निर्णय घेणार असल्याचं वृत्त आहे. आज शनिवारी डीजीसीए याबाबत एक बैठक घेणार आहे. यामध्ये नवीन व्हेरिएंट आढललेल्या देशातून येणाऱ्या विमानप्रवासावर निर्बंध अथवा या देशातून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांचं क्वारंटायन बंधनकारक करण्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.
दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचं भय वाढत चाललेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता दिल्लीत उच्चस्तरीय बैठक होणार आहे. डेल्टापेक्षाही जास्त भयंकर हा विषाणू मानला जात असल्याने तातडीने उपाय योजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
रिपोर्टर