साताऱ्याच्या हिरकणी रायडर्स ग्रुपच्या शुभांगी पवारचा अपघाती मृत्यू
मोहीम अर्धवट राहिली
- by ujwala
- Oct 12, 2021
- 1261 views
अर्धापूर नांदेड : नवरात्री उत्सवानिमित्त साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या हिरकणी बाईक रायडर्सच्या गृपमधील शुभांगी संभाजी पवारचा ३२ अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे टँकरच्या धडकेत आज सकाळी १० च्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. खराब रस्त्यामुळे बाईक स्लीप झाली आणि त्यानंतर टँकर जि.जे.१२ ए.टी.६९५७ डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
हिरकणी बाईक रायडर ग्रुपच्यावतीने साडेतीन शक्तीपीठ दर्शन ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेत ब्रेस्ट कॅन्सर, रस्ते सुरक्षा जनजागृती, महिला सबलीकरण करत १० जिल्हे व १४ तालुक्यातून हा ग्रुप जाणार होता. या मोहिमेत शुभांगी पवार, मनिषा फरांदे, अंजली शिंदे, मोना निकम जगताप, अर्चना कुकडे, ज्योती दुबे, केतकी चव्हाण, भाग्यश्री केळकर, श्रावणी बॅनर्जी, उर्मिला भोजने यांचा सहभाग आहे. नऊ महिला सदस्या दि.१० ऑक्टोबर रोजी १ हजार ८६८ किमी प्रवासासाठी बाईकने निघाल्या. त्यांना खा. उदयनराजे व अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या होत्या. कोल्हापूर येथील महालक्ष्मी व तुळजापूर येथे भवानी मातेचे दर्शन घेऊन हा ग्रुप नांदेड येथुन - माहूर, वाशी, औरंगाबाद, नाशिक, वणी व पुन्हा सातारा असा जाणार होता. आज सकाळी १० वाजे दरम्यान हा ग्रुप अर्धापूर तालुक्यातील भोकरफाटा जात होता. दरम्यान, खराब रस्त्याने शुभांगी पवारची बाईक स्लीप झाली. रस्त्यावर कोसळल्या त्यांच्या डोक्यावर टँकरचे चाक गेले.
नांदेड / महामार्गाचे काम सुरू असून संबंधित गुत्तेदार यांनी एका बाजुचा रस्ता दुरूस्ती न करता काम सुरू केले. गुत्तेदार यांच्या निष्काळजीपणामुळे हिरकणी रायडर्स ग्रुपच्या शुभांगी पवार यांचा अपघात झाला असल्याने या गुत्तेदार विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.
रिपोर्टर
REPORTER
आदर्श महाराष्ट्र वेब टीम