
शहीद संजय ताकतोडे यांच्या न्यायेसाठी लहुजी क्रांती मोर्चा करणार राज्यभर आंदोलन
न्यायासाठी ताकतोडे कुटुंबियांकडून आझाद मैदानात आमरण उपोषण
- by Reporter
- Aug 26, 2021
- 960 views
घाटकोपर (निलेश मोरे) मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड मधील एका 35 वर्षीय तरुणाने बिंदुसरा प्रकल्पात जलसमाधी घेतली होती.मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र आरक्षण मागणीसाठी मातंग समाज मोर्चा काढत आहे. अनेक वेळा अर्धनग्न मोर्चा काढून ही सरकारने समाजाच्या आंदोलनाकडे लक्ष दिले नाही. लोकसंख्येप्रमाणे मातंग समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करत संजय ताकतोडे या तरुणाने व्हिडीओ काढत जलसमाधी घेतली त्यावेळेस त्याने ' मी माझ्या समाजासाठी जीव देत आहे आता तरी सरकारने आमच्या मातंग समजाला न्याय द्यावा असे म्हणत त्याने बिंदुसरा प्रकल्पात उडी मारून जलसमाधी घेतली.
या प्रकारामुळे संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली.त्यानंतर राज्य शासनाने ताकतोडे कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र त्याकडे शासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्या कारणाने ताकतोडे कुटुंबाने 16 ऑगस्ट 2021 पासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र आमरण उपोषणाला आठवडा उलटूनही शासनाचे अद्यापही या प्रकरणाकडे लक्ष वेधले जात नाही. लहुजी क्रांती मोर्चाचे राज्य महासचिव नितीनभाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने यावेळी शहीद संजय ताकतोडे यांचे बंधू हनुमंत ताकतोडे व त्यांचे आई वडील यांची मुंबई आझाद मैदानात भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. शासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. दोन वर्षे उलटूनही सरकार निर्णयाच्या भूमिकेत नाही. ताकतोडे कुटुंबाला न्याय तर मिळालाच पाहिजे आणि मातंग समाजाच्या आरक्षणा बाबत ही सरकारने ठोस भूमिका घ्यावी अन्यथा लहुजी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ताकतोडे कुटुंबांना न्याय देण्यासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्य महासचिव नितीनभाऊ कांबळे यांनी दिला. यावेळी मुंबई अध्यक्ष अंकुश शिरसाट , संतोष शिंदे , अविनाश शिंदे , राजेश लोखंडे , नरेश कांबळे प्रेम शिंदे , सुमित बांगर आदी उपस्थित होते.
रिपोर्टर