माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयची छापेमारी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि त्यांच्या इतर मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोप प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केले आहे. या प्रकरणी याआधी त्यांना बोलावून सीबीआयने चौकशीदेखील केली होती. आता अनिल देशमुख यांच्या मालकीच्या मुंबईसह १० ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. मुंबईतील सुखदा, ज्ञानेश्वरी बंगला, वरळीतील निवासस्थानी सीबीआय पथकाकडून सकाळी ७ वाजल्यापासून छापेमारीची कारवाई सुरु आहे.

मुंबईतील बार, क्लब, पबमालकांकडून दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) याआधी माजी अनिल देशमुख यांची ११ तास कसून चौकशी केली आहे.परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने ६ एप्रिलपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सीबीआयने  याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्यासह परमबीर सिंह, पोलीस उपायुक्‍त डॉ. राजू भुजबळ, सहायक पोलीस आयुक्‍त संजय पाटील, सचिन वाझे, त्याच्या गाडीचे दोन चालक आणि बारमालक महेश शेट्टी यांच्यापाठोपाठ देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे व संजीव पलांडे यांचे जबाब नोंदविले आहेत.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या घरावर टाकलेल्या छापेमारीनंतर राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. तेथे दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात बैठक सुरु आहे.दरम्यान, एका पत्रावर इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीबीआयच्या छापेवारीवर केला आहे

संबंधित पोस्ट