गिरणी कामगारांचे लढाऊ नेते दत्ता इस्वलकर यांना गोदी कामगारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : गिरणी कामगारांचा आपल्या मागण्यां साठी डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली १८ जानेवारी १९८२ साली  बेमुदत ऐतिहासिक असा संप झाला. या संपात गिरणी कामगारांच्या लढ्यात नेहमी अग्रभागी असणारे व या संपातूनच निर्माण झालेल्या गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता इस्वलकर यांचे  ७ एप्रिल २०२१ रोजी जे. जे. हॉस्पिटलमध्ये  दुःखद निधन झाले.

गिरणी संपात कामगारांची वाताहत झाल्या नंतर लढाऊ गिरणी कामगार हतबल झाला होता. परंतु त्यांच्यात पुन्हा लढ्याची इर्षा निर्माण करण्याचे काम दत्ता इस्वलकरानी केले. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  बेमुदत उपोषणे, मोर्चे, आंदोलने, रस्ता रोको, जेल भरो करून गिरणी कामगारांच्या लढ्यात पुन्हा जिवंतपणा आणण्याचे काम केले. गिरणी कामगारांच्या हक्कांच्या घरांसाठी अनेक आंदोलने करून गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जमिनीवर दहा ते बारा हजार घरे मिळून दिली. नुकताच गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडा कार्यालयावर मोर्चाही काढला होता. बंद पडलेल्या उद्योगातील कामगारांना त्याच उद्योगाच्या जमिनीवर घरे देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय प्रथमच झाला असावा.  गोदी कामगारांच्या घरांच्या लढ्याला देखील त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. गिरणी कामगारांच्या लढ्याला सहकार्य करणारे  डॉ. शांती पटेल यांचे ते जवळचे सहकारी होते . कामगार चळवळीतील एक सच्चा, त्यागी, प्रामाणिक व लढाऊ कामगार नेता हरपला,असे भावपूर्ण उदगार ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज यांनी काढले. गिरणी कामगारांचे लढाऊ नेते दत्ता इस्वलकर यांना  बंदर व गोदी कामगारांतर्फे तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.

संबंधित पोस्ट