पबमध्ये कोरोना नियमाचे उल्लंघन अंधेरी येथील पबला पालिकेची नोटीस

मुंबई (अल्पेश म्हात्रे)  मुंबई महापालिकेने कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कडक उपाययोजना सुरू केली असून . लग्नाचे हॉल, पब, सिनेमागृह, जिमखाना, क्लब आदी गर्दीच्या ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. अंधेरी (प.) येथील ‘अमेथिस्ट’ हा पब कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करून रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवल्याचे आढळून आल्याने पालिकेच्या पथकाने या पब विरोधात कायदेशीर कारवाई केली असून पबच्या मालकाला नोटीस बजावण्यात आली आहे.

अंधेरी (प.), टी सिरीज लेने, विरा इंडस्ट्रीयल इस्टेट, अंबिका इमारत येथे तिसऱ्या मजल्या वर रात्री एक वाजल्यानंतरही म्हणजे नियमांची पायमल्ली करून सुरू ठेवण्यात आल्याबाबत तक्रार मिळताच पालिकेच्या पथकाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावर सदर ठिकाणी आयुक्तांनी कोरोना बाबत घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर पबमध्ये तरुणांची मोठी गर्दी होती. पबच्या ५० टक्के क्षमतेपेक्षाही जास्त लोकांची गर्दी होती. सामाजिक अंतर राखण्यात आलेले नव्हते. काही लोकांनी मास्क घातला नसल्याचे आढळून आले. पबमध्ये बाहेरून आलेल्या व्यक्तींची प्रवेशद्वारात तपासणी केली जात नव्हती. त्यामुळे या गंभीर बाबीची दखल घेऊन सदर पबला पालिकेने नोटीस बजावली असून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट