मुलुंडमध्ये महावितरणने केली साडेपाच कोटींची वीज बिल थकबाकी वसुली

मुलुंड:(शेखर भोसले)  वीज बिल थकविणाऱ्या ग्राहकांवर महावितरणच्या मुलुंड विभागाने कडक कारवाई करण्यास सुरू केली असून, वीज बिल थकविलेल्या काही ग्राहकांची वीज जोडणी कापण्याची मोहिम महावितरणने हाती घेतल्याने आता वीज कंपनीकडे कोट्यावधी रुपयांची थकबाकी जमा होवू लागली आहे. ज्या ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून वीज बिले भरली नव्हती, अश्या ग्राहकांची वीज जोडणी कापण्याचा सपाटाच महावितरणने आता सुरू केला आहे त्यामुळे मुलुंडमध्ये दीड हजारांवर वीज जोडण्या आतपर्यंत कापण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही दिवसातच महावितरणकडे पाच कोटी रुपये पर्यंतचा महसूल वीज बिल थकबाकी वसुलीद्वारे जमा झाला आहे. 


लॉकडाऊनच्या काळात वीजबिल माफीच्या अफवा उडाल्या होत्या. या अफवेमुळे अनेकांनी वीज बिले न भरल्यामुळे वीज कंपन्यांच्या खांद्यावर थकबाकीचा डोंगर उभा राहिला होता. तसेच सरकार आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देखील वीज बिल थकबाकी संदर्भात विविध वक्तव्ये करून ग्राहकांच्या बाजूने उभे आहोत असे चित्र निर्माण केल्या मुळे, अनेक ग्राहकांनी वीज बिल भरणे थांबवले. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजंदार ठप्प झाल्यामुळे देखील काही ग्राहकांना वीज बिल भरणे अशक्य झाले होते. परंतु महावितरणने फेब्रुवारी महिन्यापासून वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची यादी बनवून त्यांना नोटिसा पाठवण्याच्या कामाला सुरुवात केली होती. 

तसेच कोट्यवधीं रुपयांच्या थकबाकीमुळे आर्थिक बोजा आलेल्या महावितरणने वीज बिलाची सक्तीने वसुली करण्याचे निर्देश प्रत्येक महावितरण विभाग कार्यालयांना दिल्याने फेब्रुवारी महिन्यापासून थकीत बिलाची वसुली करण्याच्या कामाला महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यां मार्फत सुरुवात करण्यात आली. जे ग्राहक वीज बिल भरणार नाहीत त्यांची वीज जोडणी कापण्याची कारवाई देखील सुरू करण्यात आली. परिणामी थकीत वीज बिल भरण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. 

मुलुंडमधील तब्बल ६ हजार ३७८ ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून एकही वीज बिल भरले नव्हते अश्यापैकी अनेक ग्राहकांनी आता त्यामुळे वीज बिल भरायला सुरुवात केली आहे. महावितरणने या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उचलल्यानंतर ४ हजार ३१ ग्राहकांनी थकीत वीज बिलाचे पैसे भरले असून उर्वरित १ हजार ८६७ ग्राहकांच्या वीज जोडण्या कापण्यात आल्या आहेत. अश्या प्रकारे मुलुंड मध्ये एकूण ७ कोटींपैकी साडेपाच कोटींची वसुली केली असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

कारवाई दरम्यान सुरुवातीला महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. तसेच विविध पक्षांनी देखील आंदोलन करत महावितरणच्या थकीत बिल वसुलीच्या मोहिमेला विरोध करत आवाज उठवला होता. परंतु जमा झालेली आर्थिक तूट आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर मार्ग काढत महावितरणने चिकाटीने थकबाकी वसुली चालूच ठेवली व त्यामुळे आतापर्यंत साडेपाच कोटींची थकबाकी वसूल करण्यात महावितरणला यश आले असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट