भारतीय कामगार सेनेचे माजी अध्यक्ष श्री. रमाकांत मोरे यांचे दुःखद निधन

मुलुंड:(शेखर भोसले)  शिवसेनेच्या  स्थापने पासून बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी राहिलेले, भारतीय कामगार सेनेचे माजी अध्यक्ष रमाकांत मोरे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने शनिवारी दि २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६-४५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या चिपळूण येथील सुमन या निवासस्थानापासून निघाली. यावेळी कामगार क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, कार्यकर्ते, कामगार, शिवसैनिक व ग्रामस्थ आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात एक भाऊ, पत्नी  दोन मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कै. रमाकांत मोरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून संघटनेसाठी भरीव स्वरूपाचे योगदान दिले. कामगारांचे लढाऊ नेतृत्व म्हणून ते उदयास आले. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस म्हणून त्यांची कामगार क्षेत्रातील कारकीर्द सुरु झाली. त्यानंतर ते सरचिटणीस झाले. भारतीय कामगार सेनेतील त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर १९९३ नंतर तब्बल १० वर्ष भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून लढा दिला. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक कंपन्यांत भारतीय कामगार सेनेच्या युनियनची स्थापना केली तर अनेक कंपन्यांमधून व्यवस्थापनाशी यशस्वी बोलणी करून कामगारांना चांगली पगारवाढ व भरघोस बोनस मिळवून दिला. त्यांच्या टेरव येथील मूळ गावात जय भवानी एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना करून सुमन विद्यालय, टेरव हे विद्यालय त्यांनी सुरू केले. तसेच टेरव गावच्या विकासासाठी देखील त्यांनी भरीव स्वरूपात योगदान दिले. त्याचबरोबर ते अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांवर कार्यरत होते. शिवसेनेचा एक अभ्यासू व कार्यतत्पर कामगार नेता जाण्याने सर्व क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट