
मराठा मंडळ मुलुंड तर्फे शिवजयंती उत्सव साजरा
- by Reporter
- Feb 20, 2021
- 1145 views
मुलुंड:(शेखर भोसले)महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती मराठा मंडळ मुलुंड, मुंबई येथे शुक्रवार दि १९ फेब्रुवारी रोजी मराठा मंडळ सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी वसुंधरा कृषी संशोधन, प्रशिक्षण व सल्लागार संस्था, सोलापूरचे अध्यक्ष डॉ. संतोष हरिभाऊ थिटे यांचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील उद्बोधक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे डॉ. संतोष हरिभाऊ थिटे यांनी आपल्या एक तासाच्या व्याख्यानात 'राजा शिवछत्रपती या विषयावर, शिवरायांवरील अभ्यासपूर्ण असे ओघवते विवेचन उत्तमरीत्या सादर करून उपस्थितांच्या नजरेसमोर छत्रपती शिवाजी राजांचा साक्षात मूर्तिमंत इतिहास उभा केला. 'मंडळाचे वय ४३ असले तरी ते अजूनही १८ वर्षाचे आहे असे वाटले. येथील वरिष्ठांकडून प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली' अशा उद्गारांनी प्रमुख वक्त्यांनी मराठा मंडळ, मुलुंडबद्दल आदर व्यक्त करत व्याख्यानाला सुरुवात केली. शिवरायांबद्दल नेहमीच आपण त्यांचे पराक्रम, लढाया इ. बाबत ऐकत असतो. परंतु डॉ संतोष थिटे यांनी गरीब शेतकऱ्यां बद्दल शिवरायांना असलेली जाणीव, प्रेम आणि त्याच्यासाठी त्यांनी राबविलेल्या योजना याबद्दल माहिती दिली. 'जगाने जे केले ते शिवरायांनी कधीच केले नाही. पण शिवरायांनी जे केले ते जगाला कधीच जमले नाही. शिवरायांचा इतिहास समजून घेण्यासाठी मन, मेंदू आणि मनगट सशक्त असावे लागते आणि जो असा आहे तोच सामाजिक परिवर्तन करू शकतो', प्रमुख व्याख्यानकारांच्या या आणि अशा अनेक वक्तव्यांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले होते.
प्रमुख पाहुणे डॉ. संतोष हरिभाऊ थिटे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होवून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मराठा मंडळ, मुलुंडचे अध्यक्ष रमेश शिर्के यांनी यावेळी अध्यक्षीय भाषण केले तर सरचिटणीस अजय खामकर यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर उपाध्यक्ष सुदाम म्हामुणकर, उपाध्यक्ष अरुण चव्हाण, इत्यादी उपस्थित होते. भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे, मा. नगरसेवक नंदकुमार वैती, ईशान्य मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कैलास पाटील व इतर प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते. कोरोना संबधित शासकीय सर्व नियम पाळत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंडकर नागरिक व मराठा मंडळ, मुलुंडचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर