म्हाडा कॉलनीत सांस्कृतिक परंपरा जपत शिवजयंती उत्सव साजरा

मुलुंड:(शेखर भोसले) मुलुंड पूर्व, म्हाडा कॉलनी येथे स्वरूप सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या तरुण पिढीने आपली सांस्कृतिक परंपरा जपत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा केली. या संस्थेतील तरुण मुलांनी स्थापन केलेल्या शिवगर्जना समूहाने गेल्या कित्येक वर्षांपासूनचा आपला इतिहास समजून घेत, तो पुढील पिढीपर्यंत पोहचावा यासाठी मागील काही दिवसांपासून विशेष प्रयत्न घेतले होते. दिवाळीत सर्व सोसायटीतील तरुण जे किल्ले बनवायचे, त्या किल्ल्याची माहिती या समूहाने गोळा करून, या शिवजयंतीच्या दिवशी आयोजित कार्यक्रमात नागरिकांपर्यंत ही समग्र माहिती व शिवरायांचा सखोल इतिहास यावेळी पोचवला.

श्री छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सर्वच जण मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून दिपोसत्व साजरा करण्यात आला. "शेर शिवराज है" हे वाक्य दीप पेटवून यावेळी लिहिलेले आढळून आले. त्यानंतर संस्थेतील आबालवृध्दानी छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तृत्व सादर करून महाराजांचा इतिहास उभा केला. मोठ्या दिमाखात या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

संबंधित पोस्ट