
मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवर वाढती वाहतूक कोंडी
- by Reporter
- Feb 20, 2021
- 1104 views
मुलुंड:(शेखर भोसले)मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवर वाहतूक कोंडीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याचे आढळून आले आहे. शनिवार दि २० फेब्रुवारी रोजी देखील दुपारच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने सुमारे २ तास अत्यंत धीम्या गतीने वाहतूक चालू होती. त्यामुळे दोन्ही बाजूला एक किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी यावेळी प्रयत्नशील होते.
याबाबत अधिक महिती देताना जाणकारांनी व काही वाहनचालकांनी सांगितलं की, मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवर असलेल्या अश्फोर्ड रॉयल या परिसरात पोलिसांकडून नेहमीच नाकाबंदी करण्यात येते तसेच त्यातच सिएट कंपनीजवळील रस्त्याहून आणि नाहूर पश्चिमेकडून मोठ्या प्रमाणात वाहने मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवर येत असल्यामुळे रूणवाल ग्रीन आणि नाहूर जंक्शन जवळ वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन होत नाही. चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या वाहतूक व्यवस्थापनासाठी तेथे ट्रेफिक सिग्नल बसवण्याची आवश्यकता असल्याचे काही जाणकारांनी मत मांडले आहे. तसेच नाहूर स्टेशनचा उड्डाण पुल पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत आणि अरुंदावस्थेत आहे, त्यामुळे तेथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. परिणामी मुलुंड गोरेगाव लिंक रोड जाम होतो असे जाणकारांनी सांगितले. काही जाणकारांनी असेही मत मांडले की मुलुंड गोरेगाव लिंक रोडवरील पूजा हॉटेलच्या जंक्शन जवळ देखील वाहतूक कोंडी होते. तेथेच बाजूला असलेल्या फोर्टिस रुग्णालय व रूणवाल ग्रीन येथून बाहेर पडणारे वाहन चालक उलट्या दिशेने वाहने चालवून वाहतूक कोंडी निर्माण करतात. तसेच डी मार्टच्या पुढे मुलुंड गोरेगाव लिंक रोड थोडा अरुंद होत असल्यामुळे व त्यातच तेथे काही रिक्षा चालक अस्ताव्यस्त रिक्षा उभ्या करून राहत असल्यामुळे यापरीसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आढळून येते. वाहतूक पोलिसांनी या रिक्षा चालकांवर व चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी या जाणकार नागरिकांनी व सुजाण वाहन चालकांनी केली असून त्यामुळे मुलुंड गोरेगाव लिंक रोडवर होणारी वाहतूक कोंडी नष्ट होवून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
जवळच असलेल्या मुलुंड वाहतूक पोलिसांशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुलुंड गोरेगाव लिंक रोडवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यासाठी सर्वतोपरी उपाय योजत आहोत. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे तर सर्व सिग्नलला, चौकात वाहतूक पोलिस, वाहतुकीचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करत आहे. नाहूर उड्डाण पुलाचे काम चालू असून तेथील वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी वाहतूक पोलिस सज्ज असतात. एलबीएस मार्गावर मेट्रोचे काम चालू असल्याने व गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यांवर येत असल्यामुळे काही वेळा वाहतूक कोंडी होते परंतु त्याचे देखील योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यात येत आहे.
रिपोर्टर