
मुलुंड, भांडूप, कांजुर येथील खाडी जमिनीवरील कांदळवने संरक्षित करणार.
- by Reporter
- Feb 19, 2021
- 2627 views
मुलुंड: (शेखर भोसले)पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी कांदळवनाची भूमिका महत्वाची असल्याने, कांदळवनावर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. कांदळवनाचे जतन आणि संवर्धनासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत कांदळवनाची कत्तल रोखणे आणि कांदळवनात डेब्रिज टाकून त्याचे नुकसान करण्याच्या प्रकाराला तात्काळ आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावीत, असे आदेश या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुलुंड, भांडूप, कांजुर येथील खाडी जमिनीवर असणाऱ्या सुमारे ४०० एकर कांदळवनात माती आणि डेब्रिजचा भराव टाकून त्यावर झोपड्या बांधण्याचे सत्र गेल्या दोन वर्षांपासून परिसरातील झोपडीदादांकडून वारंवार सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात येथील झोपडीदादांनी रातोरात बांबू आणि ताडपत्री रोवून हजारों झोपड्या बांधल्याचा प्रकार मध्यंतरी समोर आला होता. आमदार सुनिल राऊत यांनी यावर कडक भूमिका घेवून स्थानिक प्रशासनावर दबाव आणून या सर्व झोपड्या तोडून परिसर मोकळा केला होता. तरीही संधी मिळताच येथील कांदळवनात भराव टाकून झोपड्या बांधण्याचे कार्य चालूच असते. त्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून कांदळवनाचे रक्षण करून कांदळवनावर भराव व डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले असल्याने मुलुंड, भांडूप आणि कांजुर परिसरातील कांदळवन यापुढे तरी सुरक्षित राहतील, अशी आशा येथील स्थानिकांना वाटत आहे.
कांदळवनाचे महत्व लोकांना समजण्यासाठी लोकांचे प्रबोधन करण्याबरोबरच कांदळवनाच्या जागी संरक्षक भिंत किंवा कुंपण, सीसीटीव्ही लावावेत तसेच कांदळवनावर डेब्रिज टाकणारी वाहने आणि डेब्रिज टाकणाऱ्या विकासकांचा शोध घेवून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले असल्याने पूर्व उपनगरातील मुलुंड ते कांजुर विभागातील कांदळवनाची सुरक्षितता निर्माण झाली आहे.
या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, पोलिस उपायुक्त चैतन्या एस. उपस्थित होते.
रिपोर्टर