
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या खात्यातून गायब झालेला ३९० कोटींचा निधी अखेर त्यांच्या खात्यात जमा
- by Reporter
- Feb 15, 2021
- 942 views
मुंबई (अल्पेश म्हात्रे):मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या खात्यातून गायब झालेला ३९० कोटींचा निधी अखेर त्यांच्या खात्यात जमा झाला आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या ऑक्टोबरपर्यंत नगरसेवकांना हा निधी विकासकामांवर खर्च करायचा असल्याने आता सर्वच नगरसेवक हा निधी खर्च करण्याच्या कामाला लागले आहेत.
महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पालिकेचा अर्थसंकल्प मांडताना पालिकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र, २४ प्रभागातील २३२ नगरसेवकांचा ३९० कोटी रुपयांचा निधी त्यांच्या खात्यातून शुक्रवारी अचानक गायब झाला होता. एवढंच नव्हे तर ज्या विकास कामांची वर्क ऑर्डर निघालेली होती. त्या कामांचा निधी सुद्धा खात्यातून गायब करण्यात आला होता. अचानक गायब झालेल्या या निधीवर प्रशासनाकडून काहीच उत्तर दिलं जात नसल्याने नगरसेवकांची झोप उडाली होती. आधीच कोरोनामुळे वर्षभर विकासकामे करता आली नाही. त्यातच आता पुढील वर्षी निवडणुका असल्याने विकास कामे करायची कशी? असा प्रश्न या नगरसेवकांना पडला होता. विकासकामे केली नाही किंवा सुरू असलेली कामे पूर्ण झाली नाही तर आगामी निवडणूक जड जाऊ शकते या विचाराने नगरसेवकांच्या तोंडाला फेस आला होता. मात्र, आता हा विकास निधी मिळाल्याने नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला आहे.
पुढील वर्षात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार असून त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत विकासकामांचा निधी वापरण्यासाठी नगरसेवकांची लगबग सुरू आहे. त्यातच हा निधी खात्यातून गायब झाल्याने आणि त्याबाबत प्रशासनाकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने नगरसेवकां मध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. आयुक्तांनी स्थायी समितीने मंजूर केलेला निधी थांबवला कसा असा सवाल उपस्थित केला जात होता. प्रशासनाने नगरसेवकांचा विकास कामांचा निधी पुन्हा नगरसेवकांना वापरण्यासाठी खुला केला आहे,
रिपोर्टर