महावितरण मध्ये कामाला लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या आरोपीला चार वर्षानंतर उरण परिसरातून गोवंडी पोलिसांनी केली अटक!

मुंबई  (जीवन तांबे)  बांद्रा येथील महावितरणच्या कार्यालयात कामाला लावतो म्हणून पीडिताकडून दीड लाख रुपये घेऊन फसवणूक करून फरार झालेल्या आरोपीला गोवंडी पोलिसांनी तब्बल चार वर्षानंतर उरण परिसरातून अटक केली आहे. अविनाश ठाकूर असे या आरोपीचे नांव आहे.चेंबूर येथील खारदेवनगर  परिसरातील सत्संग सेवा सोसायटीत रहाण्यास असलेले पोपट आलदर यांना बांद्राच्या महावितरण कार्यालयात कामाला लावतो म्हणून मच्छीन्द्र हिराजी पाटील, विजय गायकवाड व अविनाश मनोहर ठाकूर या त्रिकुटाने दीड लाख रुपये घेतले मात्र कित्येक महिने होऊन देखील आपल्याला कामावर लावत नसल्याने हे त्रिकुट आपली घोर फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच पोपट आलदर यांनी  चार वर्षा पूर्वी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्रिकुट मधील फक्त मच्छीन्द्र पाटील व विजय गायकवाड यांना अटक  करण्यात आली होती. 

मात्र यातील तिसरा आरोपी अविनाश मनोहर ठाकूर हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक खताळे, कोयंडे, इडेकर यांच्या नेतृत्वाखाली पो. उपनिरीक्षक संपत नाळे, पो. शिपाई बाड, हेमाडे यांचे पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक संपत नाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी अविनाश ठाकूर याचा शोध घेत उरण तालुक्यातील फुंदेगाव नाव्हाशेवा येथून अटक केली.

यापूर्वी त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली होती.

संबंधित पोस्ट