विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत,शिक्षक भारतीचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

मुंबई: शिक्षकांमुळे समाजात चांगुलपणा टिकून आहे. म्हणून मी नेहमी माझ्या शिक्षकांचा आदर करतो, असे विचार मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शिक्षक भारती आयोजित स्नेह-संमेलनात आज मांडले. माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम करणाऱ्याची संधी मिळाली आहे, ही भावना ठेवून मी तत्परतेने काम करण्यास प्राधान्य देतो. विद्यार्थी -शिक्षक हे एकमेव असे नाते आहे, की ज्या नात्यात विद्यार्थ्याच्या उत्तरोत्तर प्रगतीत शिक्षकाला अभिमान वाटतो. तो आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा द्वेष न करता माझ्यापेक्षा जास्त प्रगती माझ्या विद्यार्थ्यांने करावी अशी अपेक्षा करतो. आजच्या पुरस्कार सोहळयात बालरक्षकाचे काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करत त्यांनी शिक्षक भारती चांगलं काम करत असल्याचं उद्गार काढले, अशी माहिती शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी दिली. 

प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदीर येथे पार पाडलेल्या दिमाखदार सोहळ्यात विश्वास नांगरे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संमेलनात महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांवर निवड झाल्याबद्दल शिक्षक भारती संघटनेने आमदार कपिल पाटील यांचा विशेष सत्कार केला. कोरोना कालावधीत काम करणारे संस्थाचालक, मुख्याध्यापक, उपक्रमशील शिक्षक, बालरक्षक, व्हिडिओ निर्मिती /ई बुक निर्मिती / समुपदेशन करणाऱ्या शिक्षिकांचा यावेळी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षक भारतीच्या मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे यांचा बालरक्षक पुरस्कार देऊन विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. 

मुंबईतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांच्या वतीने मुंबईतील शाळा तातडीने सुरु करण्याची मागणी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी यावेळी बोलताना केली. मुंबईतील शिक्षकांचा शाळा सुरु करण्याला विरोध नसून दहावी, बारावीच्या परीक्षांची तयारी करुन घेण्यासाठी शाळा उघडणे आवश्यक असल्याचे मत मोरे यांनी मांडले. 

मुंबईतील शिक्षकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता आमदार कपिल पाटील यांना निवडून दिल्याने ते सातत्याने शिक्षणाचे प्रश्न सभागृहात तडफेने मांडत आहेत. राज्यभर पदधवीधर व शिक्षक मतदार संघात धन दांडगे उमेदवार निवडून येत असताना मुंबईतील शिक्षकांनी मात्र आमदार कपिल पाटील यांना निवडून देऊन राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे, असं मत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी केंद्र शासनाच्या तीन कृषी कायद्यांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विरोध केला पाहिजे. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्व शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील, परिसरातील नागरिकांच्या सह्या गोळा करण्याचे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी यावेळी केले. शिक्षणाच्या विविध प्रश्नांवर सरकारशी वेळ पडली तर दोन हात करायला मागे पडणार नाही. शिक्षणाचा हक्क आणि शिक्षकांचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी मी पुढेही अशीच पार पाडेन, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली.

संबंधित पोस्ट