
मुंबई महापालिकेचा ३९ हजार ३८.८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर,मुंबईकरांसाठी करवाढीचा बोजा नाही
- by Reporter
- Feb 03, 2021
- 763 views
मुंबई,दि.३(अल्पेश म्हात्रे) देशाची आर्थिक राजधानी असलेल्या, देशातील श्रीमंत अशा मुंबई शहराच्या महापालिकेचा सन २०२१-२२ चा ३९ हजार ०३८.८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पालिका आयुक्त इकबाल सिंग यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला.या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारचा करवाढीचा बोजा लादण्यात आलेला नाही.
पालिकेचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प सन २०२०-२१ पेक्षा ५ हजार ५९७.८१ कोटींनी वाढला आहे. सन २०२०-२१ मध्ये ३३ हजार ४४१.०२ कोटींचा, सन २०१९-२० चा अर्थसंकल्प ३० हजार ६९२ कोटींचा होता. तर २०१८-१९ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २७ हजार २५८ कोटी रुपये इतका सादर करण्यात आला होता. यावर्षीच्या बजेटमध्ये 2 हजार 749 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
महसुली उत्पन्नात सन २०२० - २१ आर्थिक वर्षात २८ हजार ४४८.३० कोटी वरून २२ हजार ५७२१३ कोटी असे सुधारित करण्यात आले होते. त्यात ५८७६.१७ कोटींने घट झाली आहे. सन २०२१-२२ मध्ये महसुली उत्पन्न २७ हजार ८११.५७ कोटी एवढे प्रस्ताविले असून ते सन २०२०- २१ पेक्षा ६३६.७३ कोटींनी कमी आहे. सन २०२१-२२ मध्ये जकाती पोटी नुकसान भरपाई म्हणून अनुदान १० हजार ५८३.०८ कोटी, मालमत्ता करापोटी ७ हजार कोटी, विकास नियोजन खात्यातून प्राप्त होणारे उत्पन्न २ हजार कोटी, गुंतवणुकीवरील व्याजापोटी ९७५.५६ कोटी, मलनिस्सारण आकारापोटी १५९८.०८ कोटी उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्याअर्थसंकल्पामध्ये बेस्टसाठी या वर्षी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम कर्जाची परतफेड, वेतन व्यवस्थापनाबाबत आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे, आयटीएमएस प्रकल्पाची अंमलबजावणी यासाठी वापरली जाणार आहे.
रस्ते आणि वाहतूक विभागासाठी १६०० कोटींची तरतूद
रस्ते आणि वाहतूक विभागाअंतर्गत २०२० २१ मध्ये रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात १६०० कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय फुटपाथच्या दुरुस्तीसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शिक्षणासाठी २९४४ . ५९ कोटींची तरतूद
शिक्षण क्षेत्रासाठी २९४४. ५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सीबीएसई आणि आयसीएसईच्या शाळांसाठी तसेच अवकाश संशोधनाचे शिक्षण, डिजीटल दुर्बीण आणि वेधशाळेसाठी ही तरतूद करण्यात आली आहे.
उद्यान खात्यासाठी २२६ .७७ कोटी तर अग्निशमन दलासाठी १०४ कोटींची तरतूद
याशिवाय, मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये उद्यान खात्यासाठी २२६. ७७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलासाठी १०४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पर्यटनासाठी १८३. ०३ कोटींची तरतूद
मुंबई महानगरपालिकेने पर्यटनासाठी एक समर्पित विभाग तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यातील दैनंदिन उपक्रम तज्ञ आणि मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजंट्सद्वारे चालविले जातील. पर्यटन आणि हेरिटेजसाठी अर्थसंकल्पात १८३. ०३. कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
महिलांच्या वसतिगृहासाठी १० कोटींची तरतूद
पश्चिम उपनगरात कार्यरत महिलांच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीसुविधांनी युक्त वसतिगृह बनणार आहे.
इनक्यूबेशन लॅबसाठी १५ कोटींची तरतूद
मुंबई महानगरपालिकेला मदत करण्यावर भर असलेल्या स्टार्टअप कल्पनांना मुंबई इनक्यूबेशन लॅबमार्फत आर्थिक मदत दिली जाईल. त्यासाठी मुंबई इनक्यूबेशन लॅबसाठी एकूण १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. मात्र, त्यासाठी कोणत्याही प्रकारची नोकरभरती आगामी वर्षात होणार नाही, अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी बजेट सादर करताना केली.
रिपोर्टर