
पावसाळ्यात पाणी तुंबण्यापासून होणार मुंबईकरांची होणार
- by Reporter
- Feb 03, 2021
- 633 views
मुंबई दि. ३ : पावसाळ्यात दरवर्षी मुंबईची तुंबई होते . मात्र, यंदा यातून मुंबईची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा जलदगतीने निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे सुधारण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या पर्जन्य कामासाठी ३४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हाती घेण्यात आलेल्या ५८ कामांपैकी ४० कामे पूर्ण झाली आहेत. तर १५ कामे प्रगतीपथावर असून ३ कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहेत.
२०२० च्या पावसाळ्या दरम्यान, पाण्याचा जलदगतीने निचरा होण्याच्या दृष्टीने हाजीअली, लव्हग्रोव्ह, इर्ला, ब्रिटानिया, क्लीव्हलँड आणि गझधरबांध येथील एकूण ६ उदंचन केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत होती. ६ उदंचन केंद्रांवर एकूण ४३ पंप लावण्यात आले. त्यामुळे भरतीच्या वेळी मोठा पाऊस पडून सुद्धा पाणी न साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला . मुंबईतील सखल भागामधील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी शहर आणि उपनगरमध्ये विविध ३०८ ठिकाणी ३७.५० कोटी एवढी रक्कम खर्च करुन पाण्याचा उपसा करणारे पोर्टेबल उदंचन पंप लावण्यात आले. तसेच, सन २०२० च्या पावसाळ्यामध्ये जम्बो कोविड-१९ सेंटर येथे पावसाळी पाण्याचा उपसा करणारे २१ उदंचन पंप, रेल्वे कल्व्हर्ट येथे ७ उदंचन पंप आणि इतर सखल भागात ५८ उदंचन पंप अशा एकूण ८६ ठिकाणी अतिरिक्त उदंचन पंप लावण्यात आले.
हिंदमाता जवळील बी.जे.देवरुखकर मार्ग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड वरील मडकेबुवा चौक येथील विद्यमान आर्च नलिकेचे आरसीसी पेटिका नलिकेमध्ये रुपांतर करण्यात आले. एफ/उत्तर विभागातील प्रतिक्षा नगर भागातील रस्ते, गटारे आणि पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम करण्यात आल्यामुळे हिंदमाता आणि प्रतिक्षा नगर परिसरात पूरपरिस्थितीपासून दिलासा मिळाला आहे.
भायखळा परिसरात पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी ई विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड ते रे रोडपर्यंत ई एस. पाटणवाला रोड वरील ४.० मी ३.० मी. आकाराची पेटिका नलिका बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दादर टी.टी. भागातील पाणी साचण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी एफ/उत्तर विभागातील दादर टी.टी. आणि मंचेरजी जोशी रोड वरील पर्जन्य जलवाहिन्यांच्या क्षमतेत वाढ करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तर एम.जी.रोड पासून लिंक रोड पर्यंत पोईसर नदी वळविणे आणि रुंदीकरणाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर आर/दक्षिण विभागातील कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी परिसराला पूरपरिस्थितीपासून दिलासा मिळेल.
रिपोर्टर