अमली पदार्थ तस्कराच्या पत्नीची पाकिस्तानवारी....

मुंबई : ‘एम.डी.’ या अमली पदार्थाचा तस्कर आरीफ भुजवाला याच्या पत्नीने पाकिस्तानवारी केल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या (एन.सी.बी.) तपासातून पुढे आली आहे. पाकिस्तानात जाण्याचे निमित्त, तेथील भेटीगाठींबाबत एन.सी.बी. अधिकारी अधिक तपास करत आहेत. 

भुजवाला याची पत्नी दुबईहून कराचीत गेल्याची माहिती हाती लागल्याच्या वृत्तास एन.सी.बी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला. भुजवाला आणि त्याचा साथीदार चिंकू पठाण यांचे कुख्यात तस्कर केलास राजपूत याच्याशी संबंध, दोघांनी पश्चिम आशियात हवालाद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे पाकिस्तान वारीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. 


भुजवाला याची पत्नी पाकिस्तानमध्ये कशासाठी गेली ?, कोणाला भेटली ?, याबाबत चौकशी सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. एन.सी.बी.ने दोन आठवडय़ांपूर्वी कोपरखरणे परिसरातून पठाण याला अटक केली. त्याच्या चौकशीतून भुजवाला याचे नाव पुढे आले. 

तसेच डोंगरी येथील नूर मंझिल इमारतीत ‘एम.डी.’ निर्मितीसाठी उभारलेला कारखाना एन.सी.बी.ने उद्ध्वस्त केला.त्यानंतर भुजवाला याला रायगड जिल्ह्य़ातील माणगाव येथून अटक करण्यात आली. 

डोंगरी येथील कारखान्यातून सव्वा दोन कोटींची रोकड, कोटय़वधींचे तयार एम.डी. आणि रसायने जप्त करण्यात आली. 

या कारवाईनंतर भुजवाला, पठाण यांच्या मालमत्तांबाबत तपास सुरू करण्यात आला. भुजवाला याने डोंगरी, मुंबई सेंट्रल, वसई, मीरा रोड परिसरात कोटय़वधींची मालमत्ता विकत घेतल्याची माहिती पुढे आली. त्याची पाच ते सहा बँक खाती गोठविण्यात आली असून त्याद्वारे केलेल्या व्यवहारांबाबतही चौकशी सुरू असल्याचे एन.सी.बी. अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट