
मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होणार; मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- by Adarsh Maharashtra
- Jan 29, 2021
- 1374 views
मुंबई, दि.२९ : भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला असून महानगराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुसह्य होण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. पुढील काळातील तीन ते चार वर्षे मुंबईसाठी विशेष असतील. सामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मेट्रो मार्गिका ७ व २ (अ) मार्गावरील पहिल्या मेट्रो कोचचे अनावरण, चारकोप मेट्रो डेपो संचलन आणि नियंत्रण केंद्र, ग्रहण उपकेंद्राचे उदघाटन आणि ब्रँडिंग मॅन्युअलचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार सुनील प्रभू, कपिल पाटील, विलास पोतनीस आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईला नियोजनबद्ध आखीव रेखीव स्वरूप
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मुंबईचा विस्तार होतोय. मुंबई मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होईल. कोस्टल रोड, मेट्रो या प्रकल्पांमुळे मुंबईला नियोजनबद्ध आखीवरेखीव स्वरूप देत आहोत. आजचा दिवस मुंबईसाठी वैशिष्ट्यपूर्ण असून या शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल पडले आहे.
कोरोना काळात मुंबईची लोकल सेवा बंद होती. ती १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करणे आणि गर्दी होणार याची दक्षता घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
विकासकामांना थांबवले नाही तर पूर्वीपेक्षा अधिक गती दिली
लोकलला मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने उपनगरीय रेल्वे सेवेवरील ताण कमी होणार आहे. आज मुंबईत मेट्रोची जेवढी कामे सुरू आहेत तेवढी जगात कुठेही सुरू नसतील असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. कुठल्याही विकासकामांना थांबवले नाही तर पूर्वीपेक्षा अधिक गती देताना जनतेला जे आवश्यक आहे ते देण्याचं काम सरकार करीत असल्याने हे लोकाभिमुख सरकार असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले.
अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या मार्गावर मेट्रो चाचण्यांना सुरुवात होणार असून ४ महिन्यात या मार्गावर मेट्रो धावू लागतील.
३५ किमीचा हा मेट्रो मार्ग असून त्याद्वारे अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गावर मे २०२१ पर्यंत सेवा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. २०२६ पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित असून त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणतः २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील असा अंदाज असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते ट्रॅव्हल कार्ड, ब्रँडिंग मॅन्युअलचे अनावरण तर ग्रहण उपकेंद्राचे बटन दाबून उदघाटन करण्यात आले. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी प्रास्ताविक केले.
प्रकल्पाबाबत : मुंबई मेट्रो लाईन २ ए (दहिसर पूर्व ते डीएन नगर) आणि लाइन ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) साठी वापरण्यात येणारा भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो कोच मुंबईत दाखल झाला.
या दोन्ही मेट्रो मार्गावर नियंत्रण ठेवणे आणि एकात्मिक कृतींसाठी चारकोप आगार विकसीत केले आहे. मेट्रो चाचणी मार्चपासून सुरू होईल आणि ती पुढे महिनाभर सुरू राहील. त्यानंतर मेपासून मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष व्यावसायिक कामकाज सुरू होईल.
ठळक वैशिष्ट्ये :
● चालकविरहीत ट्रेनशी अनुकूलता
● ऊर्जा वाचविणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टम
●प्रत्येक बाजूला चार दरवाजे असलेली स्टेनलेस स्टील बॉडी.
●विकसित देशातील शहरांप्रमाणे या नवीन कोचमधून प्रवाशांना त्यांच्या सायकलसह प्रवास करता येऊ शकेल.
मेट्रो लाईन २ए आणि लाइन ७ हे दोन्ही मेट्रो मार्ग महत्त्वपूर्ण आहेत, कारण यामुळे अंधेरी आणि दहिसर दरम्यान मेट्रो प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होणार असून त्यामुळे उपनगरीय लोकल गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे.
मेट्रो लाइन २ ए : दहिसर पूर्व ते डीएन नगरला जोडणाऱ्या १८.५ किमी लांबीच्या मेट्रो लाईन २ ए च्या बांधकामासाठी ६,४१० कोटी रुपये खर्च होत आहे. यात आनंद नगर, रुषी संकुल, आयसी कॉलनी, एकसर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीर नगर, कामराज नगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूर नगर, गोरेगाव मेट्रो, आदर्श नगर, शास्त्री नगर आणिडीएन नगरही १६ स्थानके असतील.
मेट्रो लाइन ७ : अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्वेला जोडणारी १६.४७५किमी लांबीची मेट्रो लाइन ७ ही ६.२०८ कोटी रुपये खर्चून बांधली जात आहे. यामध्ये दहिसर (पूर्व). ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अँड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पूर्व) अशी १३ स्थानके असतील
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम