राज्यभर चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचा कडकडीत बंद,दखल न घेतल्यास यापुढील काळात आंदोलन अधिकच तीव्र – भाऊसाहेब पठाण

मुंबई :अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील साडे तीन लाखांहून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचा-यांनी आज राज्यभर कडकडीत बंद पाळला. त्यामुळे शासकीय कामकाज आज पूर्णपणे ठप्प राहिले. सर्व कर्मचा-यांनी जोरदार घोषणा देत आपला निषेध नोंदवला आहे. दरम्यान, कर्मचा-यांच्या भावना तीव्र असून सरकारने जर अद्यापही तीन दिवस चाललेल्या या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मात्र यापुढील काळात आंदोलन अधिकच तीव्र करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारी चतुर्थश्रेणी मध्यवर्ती कामगार महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिला आहे.

आज दिवसभर चतुर्थश्रेणी कर्मचा-यांननी संप केल्यामुळे शासकीय कामकाजात मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. राज्य शासनाने शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस देऊनही कर्मचा-यांनी न जुमानता यात सहभाग दिला. यामुळे हा बंद १०० टक्के यशस्वी झाला आहे. संघटनेच्या वतीने काल दुपारच्या सुट्टीत निदर्शने करण्यात आली तर त्याच्या आदल्या दिवशी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. पण शासनाने त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे हा संप अटळ होता. यावरून शासनाला कर्मचा-यांविषयी सहानुभूती नसल्याचे दिसून येते, अशी नाराजी देखील भाऊसाहेब पठाण यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, ज्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले त्या मागण्या अशा - वर्ग ४ ची पदे निरसित करु नये, याबाबत १४ जानेवारी २०१६ चा शासनाचा २५ टक्के चतुर्थश्रेणी पदांच्या निरसित करण्याचा निर्णय रद्द करावा, शासकीय कार्यालये आणि रुग्णालये यांचे खासगीकरण थांबवावे, अनुकंपा तत्वावरील पदे त्वरित भरली जावीत, राज्यातील वारसाहक्काची पदे तत्काळ भरावीत, सेवानिवृत्त कर्मचा-याच्या एका पाल्यास त्वरित शासनसेवेत समाविष्ट करावे, सर्व शासकीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी रिक्त पदे सरळसेवा भरतीने त्वरित भरावीत, बाह्यस्तोत्राद्वारे ती भरू नयेत, वेतन त्रूटीसंदर्भात खंड २ च्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी. वर्षानुवर्षे कंत्राटाने काम करणा-यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे, आकृतीबंधानुसार सरळसेवेत तत्काळ रिक्त पदे भरण्यात यावीत, आरोग्य सेवेतील ९२५ चतुर्थश्रेणी बदली कामगारांना विशेष बाब म्हणून शासनसेवेत कायम करावे, राज्य सरकारी विमा योजना, मंत्रालय उपहार गृहे, राज्य राखीव पोलिस बल, सार्वजनिक आरोग्य विभाग येथील चतुर्थश्रेणी पदे त्वरित भरण्यात यावीत, अशा विविध स्वरुपाच्या २५ मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या असून त्याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावी,  अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी म्हटले आहे.यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही कारवाई होत नसल्यामुळे हा अखेरीचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व शासकीय कारभार चतुर्थश्रेणी कर्मचा-यांशिवाय अशक्य असल्यामुळे सर्व शासकीय कामकाज ठप्प होणार असल्यामुळे याप्रकरणी लवकरात लवकर शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी राज्यातील जनतेकडून करण्यात येत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट