
हा घ्या पुरावा!सीमाभागातल्या सव्वाशे वर्ष जुन्या मराठी संस्कृतीचे दृकश्राव्य चित्रण,५० वर्षांपूर्वीचा माहितीपट माहिती व जनसंपर्कच्या युट्यूब वाहिनीवर
- by Adarsh Maharashtra
- Jan 28, 2021
- 1166 views
मुंबई दि.२८: साठ वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी, मराठी, कोंकणीतून अर्थ शिकविणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नामफलक, कानडा जिल्ह्याचे ‘विचारी’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, १९१२ चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मराठी वार्षिक अहवाल, बेळगावमधील १८९० मध्ये बांधलेल्या पुलाचा मराठीतला शीलाफलक अशा प्रकारे कर्नाटकातल्या सीमा भागामधले शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीपासूनच्या मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे पुरावे सलगपणे समोरच्या कृष्णधवल पडद्यावर उलगडत जातात आणि आपण स्तिमित होतो.
सध्याच्या सीमाभागातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाने ५० वर्षांपूर्वी तयार केलेला 'ए केस फॉर जस्टीस' हा ३५ मिनिटांचा अप्रतिम आणि संग्राह्य लघुपट सर्वाना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. पूर्वीच्या रिळांवर चित्रीकरण केलेल्या या चित्रपटाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डिजिटल स्वरुपात पुनरुज्जीवित केल्याने इतका जुना दस्तऐवज आपण सहजपणे पाहू शकतो.
हा लघुपट आपण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या (https://www.youtube.com/MaharashtraDGIPR) यूट्यूब वाहिनीवर https://bit.ly/3r4WHst पाहू शकता.
“ घडली माला अश्रू फुलांची” या सामाजिक नाटकाचा नोव्हेंबर १९७० मधला मराठीतला फलक, १९३९ मधील स्थापन झालेल्या कारवारच्या मराठी महिला मंडळाची बैठक, तत्कालीन म्हैसूर राज्यातील नामांकित नेते आनंद नाडकर्णी यांचे १९१२ मधील मराठीतले दत्तक पत्र, कानडा जिल्ह्यातील १९६० मधील पहिले मराठी वृत्तपत्र, १८९० मधला बेळगाव म्युनिसिपालटीने बांधलेल्या पुलावरील मराठीतील शिलाफलक, कोळी पुरुष आणि महिलांची त्या काळाची महाराष्ट्रीय वेशभूषा असे नानाविध पुराव्यांचे प्रभावी चित्रीकरण या लघुपटात पहायला मिळते. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांनी सीमा प्रश्नासंदर्भात बैठका आणि सभांमधून केलेल्या भाषणांचे व्हिडीओ देखील आपण पाहू शकतो.
सीमाप्रश्नाबाबत ५० वर्षांपूर्वी महाराष्ट्राने तयार केलेला दृकश्राव्य स्वरुपातील हा दस्तऐवज सीमा भागातील आणि बेळगाव शहरातील लोकजीवन, व्यापारी आणि अन्य व्यवहार, रोजची भाषा, वृत्तपत्रांचा वापर, शाळा, देवळे, मठ, पोथ्या, मराठी गाणी, भजन/कीर्तने, नगरपालिका दस्तऐवज, व्यापारी चोपड्या, खतावणी, शीलालेख असे जवळपास हजारो फुटांची लांबी भरेल एवढे चित्रीकरण करुन तयार केलेला हा माहितीपट आहे.
कुमारसेन समर्थ, विश्राम बेडेकर यांचे दिग्दर्शन आणि मार्गदर्शन
या माहितीपटाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन केले होते तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शिवाजीराव गीरधर पाटील आणि शरद पवार यांनी. मुख्यमंत्र्यांचे तत्कालीन जनसंपर्क अधिकारी मधु मंगेश कर्णिक यांची संकल्पना, संहिता, लेखन असलेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शक होते चित्रपटतज्ज्ञ कुमारसेन समर्थ. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विश्राम बेडेकर, निवृत्त मुख्य सचिव एम.डी. भट (आयसीएस) आणि ना.ग. नांदे यांचे मार्गदर्शन या माहितीपटासाठी घेण्यात आले होते.
निर्मितीसाठी जुनी मराठी कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी त्यावेळच्या बेळगावच्या नगराध्यक्षा श्रीमती इंदिराबाई खाडे, शिवाजीराव काकतकर, बळवंतराव सायनाथ, बाबुराव ठाकूर, नीलकंठराव सरदेसाई तसेच सर्वश्री मनसे मुचंडी, जुवेकर आणि याळगी यांनी निर्मितीसाठी सहकार्य केले. तत्कालीन आमदार बापुसाहेब एकंबेकर यांनीही त्यावेळी मदत केली. ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे इंग्रजी संहिता लेखन आणि बर्कली हिल यांचे प्रभावी निवेदन असलेला हा लघुपट आवर्जून पाहण्यासारखा आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम