मुलुंडमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

मुलुंड:(शेखर भोसले)  १५५ मुलुंड विधानसभा मतदार संघातर्फे सोमवार दि २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मुलुंड पूर्वेकडील निवडणूक कार्यालयातर्फे यानिमित्ताने सशक्त लोकशाहीसाठी मतदार साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम मुलुंड निवडणूक कार्यालयातर्फे दिवसभर हाती घेण्यात आले होते.

मतदार आणि मतदान यासंबंधीच्या एका परिसंवादाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. मतदानाचे महत्व मतदारांना पटवून देण्यासाठी व जनजागृतीसाठी मुलुंडमधील मोक्याच्या ठिकाणी, चौकात केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे पथनाट्ये सादर करण्यात आली. तसेच मतदानासंबधित संदेश देणाऱ्या रांगोळी व चित्रकलेचे आयोजन निवडणूक कार्यालयात करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या स्पर्धकांना मतदान नोंदणी अधिकारी कल्पना जगताप भोसले यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच सक्षम लोकशाही साठी मतदारांमध्ये साक्षरता निर्माण व्हावी यासाठी मुलुंड आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने मुलुंड विभागात प्रभातफेरी काढण्यात आली. 

मतदान नोंदणी अधिकारी, उपजिल्हाधिकारी कल्पना जगताप तसेच नायब तहसीलदार सुधीर घोसाळकर यांनी यानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना मतदारांना साक्षर होण्याचे तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे किती जरूरीचे आहे हे समजावून सांगितले व नवीन मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नव मतदारांना स्मार्ट कार्ड देण्यात आले. केंद्रस्तरीय अधिकारी प्रतिक्षा खंकर, अविनाश बिराजदार व इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता.

संबंधित पोस्ट