महापालिकेत प्रथमच होणार बाळासाहेबांची जयंती!

मुंबई, दि.२२: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्यावतीने प्रथमच त्यांची जयंती साजरी केली जाणार आहे. शनिवारी, २३ जानेवारी रोजी बाळासाहेबांची जयंती असून प्रथमच ही जयंती महापालिकेच्यावतीने साजरी होणार आहे. आजवर बाळासाहेबांची जयंती महापालिकेच्यावतीने साजरी करण्यात येत नव्हती, परंतु या वर्षापासून या जयंतीला सुरुवात होत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी १९२६ रोजी जन्म झाला असून त्यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले. तेव्हापासून शिवसेनेच्यावतीने त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते. परंतु शिवसेना प्रमुखांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने सुरु होती. त्यानुसार बाळासाहेबांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत काही महिन्यांपूर्वी समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुषांच्या यादीत बाळासाहेबांचे नाव आल्यानंतर ही पहिलीच जयंती मुंबई महापालिकेच्यावतीने साजरी केली जाणार आहे.

महापालिका मुख्यालयात बाळासाहेबांचा अर्धपुतळा बसवण्याची मागणी होत आहे. परंतु सभागृहात पुतळा उभारण्यास जागा नाही. त्यामुळे पुतळा उभारण्याचा प्रस्ताव तुर्तास बाजुला पडलेला असून यावर्षी महापौरांच्या दालनाबाहेर राष्ट्रपुरुषांच्या तसबीर लावून जयंती तसेच पुण्यतिथी साजरी केली जाते. त्याप्रमाणेच आता बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती केली जाणार आहे. या कार्यक्रमाला महापौर किशोरी पेडणेकर अथवा उपमहापौर सुहास वाडकर तसेच प्रशासनातील अधिकारी व चिटणीस आदी उपस्थित राहणार आहेत.

संबंधित पोस्ट