
लस टोचल्यावर केईएम, देसाई रुग्णालयात डॉक्टर, नर्सवर सौम्य दुष्परिणाम
- by Reporter
- Jan 20, 2021
- 1761 views
मुंबई : शनिवारपासून कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरणादरम्यान पालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील एका डॉक्टरला तर केईएम रुग्णालयातील एका नर्सवर दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. या दोघांनाही चक्कर येणे, शरीरात वेदना आणि ताप यासारखा त्रास झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मात्र, ही लक्षणे लसीकरण केलेल्या व्यक्तींमध्ये सामान्य आहेत असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनावरील लसीकरणाला शनिवारी सुरुवात झाली. लसीकरणादरम्यान मुंबई महापालिकेच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयातील ५१ वर्षीय डॉ. जयराज आचार्य यांना शनिवारी कोव्हिशील्ड लसीचा डोस घेतल्यानंतर चक्कर, अशक्तपणा, डिहायड्रेशन आणि ताप यासारख्या तक्रारींसाठी रविवारी अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल केले होते. दरम्यान, आता त्यांची प्रकृती स्थिर असून ताप कमी झाल्याचे व्हि.एन. देसाई रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांना सोमवारी संध्याकाळीच डिस्चार्ज दिला आहे, असे व्ही.एन. देसाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रभाकर मोरे यांनी सांगितले.
मुंबईच्या केईएम रुग्णालयातून आणखी एक अशी घटना समोर आली. लसीकरणानंतर एका महिला आरोग्य सेविकेला ताप येऊन सामान्य वॉर्डात दाखल केले आहे. सध्या प्रकृती स्थिर असून बुधवारी तिला घरी सोडण्यात येणार आहे. पहिला डोस रोग प्रतिकारक प्रतिक्रियेला कारणीभूत ठरल्याने ताप आणि शरीरदुखी सारखी लक्षणे ही सामान्य आहेत. शिवाय, भीती आणि रिकामी पोट यामुळेही सौम्य दुष्परिणाम दिसून आला असेल. शरीराची यंत्रणा त्यावर प्रतिक्रिया देतेय ही एक सकारात्मक बाब आहे. काही जणांमध्ये लक्षणे दिसतात. तर, काही जणांमध्ये नाही दिसत, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
मुंबईत पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीचे १ लाख ३९ हजार ५०० डोस पाठवण्यात आले आहेत. दिवसाला ९ लसीकरण केंद्रांवर ४० बुथवर दिवसाला ४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यात लस दिली जात आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार अशा चार दिवसात सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत लसीकरण केले जात आहे.
रिपोर्टर