भ्रष्टाचाराविरुद्ध उल्हासनगरात सुरू असलेल्या भीम आर्मीच्या आंदोलनाला प्रचंड यश.

आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण आंदोलन समाप्त.

मुंबई(प्रतिनिधी)  उल्हासनगर महानगरपालिका मध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची कसून चौकशी व्हावी आणि विशेषतः उल्हासनगर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या भ्रष्टाचाराची व त्यांच्या खोट्या शैक्षणिक पदवी पासून ते त्यांच्यावर असलेल्या सर्व आरोपांची त्वरित चौकशी सुरू करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ,अश्या विविध मागण्यांसाठी भीम आर्मी सह अन्याय विरोधी संघर्ष समिती , बहुजन मुक्ती पार्टी , पत्रकार सुरक्षा समिती , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ , राष्ट्रीय मूलनिवासी नायक पत्रकार संघ इतर सामाजिक संस्था , पक्ष संघटना यांनी वरिष्ठ पत्रकार,ज्येष्ठ साहित्यिक मा.दिलीपजी मालवणकर आणि भीम आर्मीचे उल्हासनगर शहरप्रमुख मा.कुमारभाई पंजवाणी यांच्या नेतृत्वाखाली  ७ जानेवारी पासून सुरू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनात आज भीम आर्मीचे केंद्रीय नेते अशोकभाऊ कांबळे तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी महासचिव मा.सुनीलभाऊ गायकवाड यांनी सहभाग नोंदविला.हे आंदोलन तीव्र होत चालल्याचे लक्षात येताच उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मा.दयानिधी हे स्वतः आंदोलकांना भेटावयास उपोषण स्थळी आले आणि त्यांनी सर्वांसोबत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची जाहीर घोषणा केल्याची माहिती   भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख नेते आणि ठाणे जिल्हाप्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

१९ जानेवारी रोजी दुपारी माननीय आयुक्त महोदयांसोबत आंदोलनकर्त्यांच्या झालेल्या  निर्णायक बैठकीत आंदोलकांच्या मागण्या मान्य करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिल्यानंतर सदरहू आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून उपोषण समाप्ती करण्यात आल्याची जाहीर घोषणा दिलीपजी मालवणकर आणि कुमारभाई पंजवाणी यांनी केल्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले.

आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानुसार भ्रष्टाचाऱ्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा उल्हासनगर महानगरपालिकेला  " टाळे ठोको" आंदोलन करण्यात येणार असल्याचा जाहीर इशारा दिलीपजी मालवणकर आणि कुमारभाई पंजवाणी यांनी अशोकजी कांबळे , प्रशांतजी वाघमारे , शोएब मोमीन , ज्योतीताई भोसले अनिलजी महाजन तसेच सुनीलभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीत दिल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट