
बीकेसी कोविड सेंटरमधून राज्यस्तरीय लसीकरणाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ कोरोना लसीकरण क्रांतीकारक पाऊल!
मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर त्रिसूत्रीचा विसर पडू देऊ नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
- by Adarsh Maharashtra
- Jan 16, 2021
- 1512 views
मुंबई, दि. १६: कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचे सांगतानाच सर्वात उत्तम लस ही मास्क आहे. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा मुकाबला केला आहे त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीकरणाच्या राज्यस्तरीय शुभारंभाच्या कार्यक्रमात केले.
बीकेसी येथील कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होऊन लसीकरण मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी पहिल्या टप्प्यातील प्राधान्य गटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. यावेळी पर्यटन तथा मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार झीशान सिद्दीकी, उपमहापौर सुहास वाडकर, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडीत आदींची उपस्थिती होती
डॉ. मधुरा पाटील यांना पहिली लस घेण्याचा मान
यावेळी या कोविड सेंटरमधील आहार तज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत पहिली लस घेण्याचा मान मिळाला. त्यानंतर डॉ. मनोज पाचंगे यांना लस देण्यात आली. टाळ्यांच्या गजरात कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला.
कोविड सेंटर असेच ओस राहो..
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, आजचा दिवस क्रांतीकारी आहे. याबद्दल कोणाचंही दूमत नसेल. आजही ते दिवस आठवले तर अंगावर काटा येतो, दिवसरात्र तणाव होता. जगभरात सगळीकडे अशीच स्थिती होती. युद्धकालीन परिस्थितीसारखं आपण १५ दिवसांत हे सेंटर उभारलं आणि इथून सुरुवात केल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी तसेच राज्यभरात आपण अशी सेंटर्स उभारली. या सेंटर्सचा मोठा आधार आपल्याला लाभला. आज हे सेंटर ओस पडलेलं आहे ते असेच राहो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
कोविड योद्धांना मुख्यमंत्र्यांचा मानाचा मुजरा
या सेंटरमध्ये जुन-जुलैपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची गर्दी होती. इथे काम करताना आपलं काय होणार याचा विचार न करता रुग्णांची सेवा करणाऱ्या, त्यांचे जीव वाचवणाऱ्या कोविड योद्धांना मुख्यमंत्र्यांनी मानाचा मुजरा केला.
सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांच पालन कराव
आपण खूप दिवसांपासून ऐकतोय लस येणार असं ऐकत होतो. आज आपल्या हातात लस आहे. सर्वांच्या साक्षीने या लसीकरणाची आज सुरुवात होतेय. पण, आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे तोवर सर्व सूचनांचं कोटेकोर पालन करा. अजूनही संकट टळलेलं नाही आहे. लस आलेली असली तरी सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस, महिने लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांच पालन कराव, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
महापालिकेचे आयुक्त श्री. चहल यांचं मुंबईचे रक्षक म्हणून अभिनंदन करताना. टास्क फोर्सचे डॉ.जोशी, डॉ.राहुल पंडित, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास आपल्या आरोग्य व्यवस्थेचे खांब असल्याचे गौरवोद़्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
मुंबईत एकाच वेळी १ कोटी २ लाख लस साठवणुकीची क्षमता
मुंबईत एकाच वेळी १ कोटी २ लाख लस साठवणुकीची क्षमता असल्याचे श्री. चहल यांनी सांगितले. कांजूरमार्ग, परळ यासोबतच अन्य सहा ठिकाणी साठवणुक क्षमता असून लसीकरणासाठी ५०० पथक व दिवसाला ५० हजार जणांना लसीकरणाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयुक्त श्री. चहल, अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी, बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम