पालिकेच्या एम पूर्व विभागात क्लीनअप मार्शलकडून सामान्य नागरिकांची लूट

मुलुंड: (शेखर भोसले)पालिकेतर्फे सर्व वार्डात मास्क न घालता किंवा मास्क अर्धवट घालून रस्त्यावर फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. या कामासाठी पालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पालिकेतर्फे क्लीनअप मार्शलची देखील नेमणूक करण्यात आली आहे. परंतु देवनार, गोवंडी विभाग येत असलेल्या एम पूर्व वार्डात नेमण्यात आलेले क्लीनअप मार्शल परिस्थितीचा गैरफायदा घेत असून, व्यवस्थित मास्क घातलेल्या सामान्य नागरिकांना पकडून त्यांच्याशी वाद करून जबरदस्तीने पावती फाडून दंड वसूल करत असल्याच्या तक्रारी आल्या असून हे 

क्लीनअप मार्शल व त्यांचे ठेकेदार संबंधित महानगर पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने, सामान्य नागरिकांना लुटत असल्याचा आरोप यानिमित्ताने या परिसरात होत आहे.

मुंबई महानगर पालिकेतर्फे पालिका कर्मचाऱ्यांच्या साथीने तैनात करण्यात आलेल्या क्लीनअप मार्शलना रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना पकडून दंड वसूल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही विना मास्क फिरू नये म्हणून महापालिकेतर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु एम पूर्व वार्डाच्या देवनार, गोवंडी विभागात मात्र व्यवस्थित मास्क घातलेल्या व्यक्तींकडूनही हे क्लीनअप मार्शल दमदाटी करून, वाद घालून दंड वसूल करत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे करण्यात आल्या होत्या. त्याला अनुसरून वार्ड क्र १४१ चे रस्ते, साधन सुविधा व आस्थापनाचे प्रभाग संघटक (एम पूर्व विभाग) सचिन ससाणे यांनी आपले साथी श्रीमंत ठेंगले व इतर मनसे सैनिकांसोबत घटनास्थळी जावून प्रत्यक्ष पाहणी केली असतामहापालिकेचे बोध चिन्ह असलेले ओळखपत्र गळ्यात घालून तेथे तैनात असलेले क्लीनअप मार्शल
फिलिप डिसुजा व साहिल अय्युब शेख हे कोणताही दोष नसलेल्या, मास्क व्यवस्थितरित्या घातलेल्या सामान्य नागरिकांना पकडून त्यांच्याकडून जबरदस्तीने दंड वसूल करत असल्याचे आढळून आले.यासंदर्भात सचिन ससाणे  यांनी एम पूर्व विभागातील पालिकेचे घन कचरा व्यवस्थापनाचे असिस्टंट इंजिनियर सत्यजित पाटील यांच्याकडे सदर गार्हाणे मांडले व त्यांना जाब विचारला असता  सत्यजितपाटील यांनी उडवा-उडवीची उत्तरे देवून सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले.

सत्यजित पाटील हे क्लीनअप मार्शल व त्यांच्या ठेकेदारांना पाठीशी घालून सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट करत असून सत्यजित पाटील यांच्या संगनमतानेच  सामान्य नागरिकांकडून विनाकारण दंड वसूल केला जात असल्याचा आरोप  संतापलेल्या मनसे सैनिकांनी व प्रभाग संघटक सचिन ससाणे यांनी केला आहे तसेच या प्रकरणात एम पूर्व पालिका सहा आयुक्त व पालिका आयुक्तांनी लक्ष घालून संबंधित क्लीनअप मार्शल, ठेकेदार व पालिका अधिकारी सत्यजित पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

एम पूर्व पालिकेचे असिस्टंट इंजिनियर सत्यजित पाटील यांनी यासंदर्भात सांगितले की 'क्लीनअप मार्शल, पालिकेने आखून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून कार्य करीत असून जर कोणाकडून चुकीच्या पद्धतीने दंड वसूल केला गेला असेल किंवा याबाबतीत कोणाचीही काही तक्रार असेल तर त्यात लक्ष घालून संबधित क्लीनअप मार्शल व त्यांच्या ठेकेदाराला इशारा वजा सूचना केल्या जातील व नियमांचे पालन करण्याचे व सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास न देण्याचे आदेश दिले जातील. तसेच काल कोरोना लशीच्या माहितीसाठी आम्हां अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण होते त्यामुळे त्यात मी बीजी होतो म्हणून दुर्लक्ष झाले असेल परंतु क्लीनअप मार्शल संबंधित काहीही तक्रार असेल तर नक्कीच त्यात लक्ष घातले जाईल.'

संबंधित पोस्ट