
मराठी भाषा पंधरवड्याचे उद्घाटन मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालविण्याची गरज- मंत्री सुभाष देसाई
- by Adarsh Maharashtra
- Jan 14, 2021
- 2638 views
मुंबई, दि.१४: मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालविण्याची गरज असून यासाठी ‘मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा व मराठीचा आग्रह धरा’ असे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, उच्च व तंत्र शिक्षण (ग्रंथालय) विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवडानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात या पंधरवड्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने उद्घाटन झाले.
यावेळी मराठी भाषा राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मराठी भाषेसाठी वेगवेगळ्या प्रकारे योगदान देणाऱ्या मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना गौरविण्यात आले.मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१४ ते २८ जानेवारी २०२१ या कालावधीत हा पंधरवडा साजरा केला जाणार आहे.
मराठी भाषा मंत्री श्री.सुभाष देसाई म्हणाले, मराठी भाषा विभागाने मराठी भाषेच्या सर्व उपक्रमांना पुढे नेण्याचे काम केले आहे. ते कौतुकास्पद असून त्याचे फलित आज दिसू लागले आहे. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी काही ना काही लिखाण करीत आहेत. ही मंत्रालयाला लाभलेली प्रदीर्घ परंपरा आहे. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही परंपरा पुढेही चालू ठेवावी, असे आवाहन श्री.देसाई यांनी केले.
मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जी पुस्तके लिहिली आहेत त्याचे प्रदर्शन मराठी भाषा पंधरवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ठेवण्यात येईल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून इतरांनाही प्रेरणा मिळेल. मराठी भाषा विभागातर्फे या कामासाठी पुरस्कार देण्यात आले आहे. त्यांना आजपासून मराठी भाषेचे अग्रदुत म्हणून गणले जाईल, असेही श्री.देसाई यांनी सांगितले.
प्रत्येक विभागात कारभार मराठीत झाला पाहिजे बँक, पोस्ट, रेल्वे या ठिकाणी मराठी भाषेमधून व्यवहार व्हावा यासाठी आग्रह धरला पाहिजे. केंद्र सरकारच्या कार्यालयातील कारभार मराठी भाषेतून व्हावा असे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाचा त्या ठिकाणी प्राधान्याने वापर व्हावा. केंद्रीय कार्यालयात दर्शनी भागावर मराठीमध्ये फलक लावण्यात यावे, असेही श्री.देसाई यांनी सांगितले.
केवळ एक दिवस गोड गोड बोला असे नसून कायमच आपल्याला मराठीचा गोडवा पुढे नेवून तो जपायचा आहे. केवळ ‘बोलतो मराठी’ म्हणून चालणार नाही तर आपल्या रोजच्या शासन कारभारात ‘वापरतो मराठी, आग्रह धरतो मराठी’ असा उल्लेख केला पाहिजे, असे प्रतिपादन श्री. देसाई यांनी यावेळी केले.
मराठी भाषा राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम म्हणाले, मराठी भाषेचा प्रचंड मोठा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे वेगळे स्थान निर्माण केले. मराठी भाषा विभागाच्यावतीने मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्याचे काम केले जात आहे.
सचिव श्रीमती प्राजक्ता लवंगारे म्हणाल्या, कोविडचा कालावधी असल्यामुळे आम्ही याकडे संधी म्हणून पाहिले आहे. मराठी भाषा पंधरवडा ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी मातीमध्ये ज्या संतांनी जन्म घेतला त्या मातीचे गुणधर्म आपल्या सर्वांमध्ये रुजावे. त्याचे स्मरण व जतन व्हावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
'निलांबरी' बसमध्ये फिरते प्रदर्शन
'निलांबरी' बसमध्ये फिरते ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. भाषा संचालनालयाचा परिभाषा कोश, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि शासकीय मुद्रणालयाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आगळ्यावेगळ्या स्वरुपात असणार आहे. बेस्टच्या 'निलांबरी' बसमध्ये हे फिरते प्रदर्शन असणार आहे. मंत्रालय आवारातून निघणारी ही बस पुढील दोन दिवस फोर्ट, नरिमन पाईंट या भागात असेल. या प्रदर्शनातून साहित्य रसिकांना सवलतीच्या दरात पुस्तके विकत घेता येतील. या फिरते प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे यांनी केले.
यावेळी मराठी भाषेसाठी वेगवेगळ्या प्रकारे योगदान देणारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, वरिष्ठ सहाय्यक संचालक डॉ. सुरेखा मुळे, वरिष्ठ सहाय्यक संचालक श्रीमती अर्चना शंभरकर, लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, सहसचिव विवेक दहीफळे, उपसचिव नगरविकास सतिश मोघे, उपसचिव प्रशांत रांजणीकर, सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी वंदना जैन, सहसचिव सतिश जोंधळे, कक्ष अधिकारी संजय जाधव यांना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम