चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अष्टधातुचा पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्न करणार – आ. सुधीर मुनगंटीवार !!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न !!!
- by Reporter
- Jan 11, 2021
- 1333 views
चंद्रपूर : चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर १९५६ मध्ये १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोक बुध्द धम्माची दीक्षा घेण्यासाठी आले होते. महामानव बाबासाहेबांनी दीक्षा नागपूर आणि चंद्रपूर इथेच दिली हे विशेष महत्वाचे आहे. चंद्रपूर जिल्हयाने १९६२ च्या भारत-चीनच्या युध्दात देशात सर्वात जास्त सुवर्णदान देण्याचा विक्रम केला आहे. हा जिल्हा देशभक्तांचा जिल्हा आहे. दीक्षाभूमीवर येताना पवित्र भावना मनात निर्माण होते. प्रज्ञा, शील, करूणेचा दिव्य संदेश देणा-या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अष्टधातुचा पुतळा उभा करण्यासाठी आपण येत्या काळात प्रयत्न करू, असे आश्वासन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख, माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
दिनांक १० जानेवारी रोजी चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या लोकार्पण सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी श्री. अरूण घोटेकर, श्री. अशोक घोटेकर, महापौर सौ. राखी कंचर्लावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहापौर राहूल पावडे, मनोहरराव खोब्रागडे, सखाराम पालतेवार, प्राचार्य राजेश दहेगांवकर, कुणाल घोटेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात २ कोटी रू. निधी खर्चुन बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, माझ्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमीत्त विविध महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले व त्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिला. त्यात प्रामुख्याने मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय, लंडन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान स्मारक म्हणून विकसित करण्याचा निर्णय, दादर येथील चैत्यभूमीचा विकास, शहरी भागात नोकरी करणा-या मागासवर्गीय महिलांसाठी मुंबई, पुणे व नागपूर येथील वर्कींग वुमेन्स होस्टेल्स सुरू करण्याचा निर्णय, मुलींसाठी नव्याने ५० शासकीय वसतीगृहांना मान्यता, भाररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळी केलेल्या स्थळांचा विकास करण्याचा निर्णय, कर्मवीर दादासाहेब गायकवाड शेतजमीन वाटप योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी ३ लाखांऐवजी तब्बल ८ लाख रू. अनुदान देण्याचा निर्णय असे विविध निर्णय आम्ही घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटीच्या पदाधिका-यांनी दीक्षाभूमी येथे आंबेडकर भवनाचे बांधकाम करण्याची मागणी केली होती. ही मागणी त्वरीत मान्य करत त्यासाठी २ कोटी रू. निधी आम्ही मंजूर केला. आज हे सभागृह लोकार्पीत करताना मला मनापासून आनंद होत आहे. दीक्षाभूमी शांती, समता, मानवतेचा संदेश देणारी पवित्र भूमी आहे. या पवित्र दीक्षाभूमीच्या विकासात मी खारीचा वाटा उचलू शकलो या भावनेतून मी स्वतःला भाग्यवान समजतो, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार, अशोक घोटेकर यांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्तावीक मनपा सदस्य राहूल घोटेकर यांनी केले. आम्ही पवित्र दीक्षा-भूमीवर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम करण्यासाठी आ. मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली. त्यांनी ही मागणी त्वरीत पूर्ण केली. विकासासंदर्भात दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणजे आ. सुधीर मुनगंटीवार हे आहे. त्यांनी या सभागृहाच्या बांधकामाबाबत दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
रिपोर्टर