पोलिसांनी फलक काढल्याने मुलुंडमध्ये तणावाचे वातावरण

मुलुंड: (शेखर भोसले)भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कणकवली येथे जे वादग्रस्त वक्तव्य केले त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अभिजीत कदम यांनी चंद्रकांत पाटील यांच्या जाहीर निषेधाचे फलक शनिवारी मुलुंड मध्ये सर्वत्र लावले होते. मुलुंड नवघर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी हे फलक काढल्याने मुलुंड पूर्वेत काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

पोलिसांच्या या एकतर्फी कृतीबद्दल अभिजित कदम व इतर काही शिवसैनिक यांनी सकाळी नवघर पोलिस ठाण्यात धडक देवून फलक काढल्याबद्दल नवघर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणतेही गढूळ वातावरण निर्माण होवू नये यासाठी हे फलक काढण्यात आल्याचे सांगितलं. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल तसेच ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी तेथे जमलेल्या शिवसैनिकांनी केली. परंतु नवघर रोड पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याने, अभिजित कदम यांच्या वतीने नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्री. उत्तम रिकामे यांना लेखी निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर उचित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संबंधित पोस्ट