
मालाड यानगृहात ठेकेदाराच्या बेपर्वाई मुळे इमारतीचे छत कोसळले.
- by Reporter
- Jan 09, 2021
- 1047 views
मुलुंड:(शेखर भोसले) महानगर पालिकेच्या मालाड यानगृहाच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम चालू असून या बांधकामासाठी वापरण्यात येत असलेल्या सळ्या, दगड, माती सतत पडत असतात. दि ६ जानेवारीला काही सळ्या या इमारतीच्या छतावर पडल्याने, इमारतीचे छत कोसळले. छत कोसळून यानगृहाच्या आत पडल्याने यानगृहात काम करणारे पालिका कामगार जिवाच्या भीतीने सैरावैरा पळाले त्यामुळे थोडक्यात बचावले आहेत. अन्यथा मोठा अपघात होवून पालिका कर्मचारी गंभीर जखमी झाले असते.
तरीही सुरक्षेसंबंधी कोणतीही काळजी विकासकाने न घेतल्याने दि ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी या इमारतीतून लोखंडी सळ्या यानगृहात पडल्या. त्यामुळे यानगृहात मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. परंतु कामगार, कर्मचारी इतरत्र ठिकाणी धावले व त्यांनी आपला जीव वाचवला. या प्रकारामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासना विरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे चिटणीस संजय वाघ, महेश गुरव, राजेश इंदुलकर यांनी कामगार, कर्मचाऱ्यांची भेट घेवून प्रशासना बरोबर विकासकावर कारवाई करण्याची मागणी केली. सदर विकासकावर तातडीने कारवाई करावी अन्यथा या विकासका विरोधात युनियनला काम बंद आंदोलन करावे लागेल असा ईशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी यानिमित्ताने दिला आहे.
विकासकाला सुरक्षेचे सर्व नियम पाळून काम करण्याचे सांगितले असून तरीही विकासका कडून सुरक्षा नियम पाळले जात नसतील तर लवकरच उचित कारवाई केली जाईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
रिपोर्टर