बीकेसी येथील जम्बो कोविड समर्पित रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी आयोजित ड्राय रनचा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते शुभारंभ
कोरोना लसीकरण मोहिमेत मुंबईकर नागरिकांनी सहभागी होण्याचे महापौरांचे आवाहन
- by Adarsh Maharashtra
- Jan 08, 2021
- 1261 views
मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे कोरोना लसीकरणासाठी बीकेसी येथील जम्बो कोविड समर्पित रुग्णालयात "ड्राय रन" मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेचा शुभारंभ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवार दि. ८ जानेवारी २०२१ रोजी पार पडला.
याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा श्रीमती प्रवीणा मोरजकर, केंद्र शासनाचे प्रतिनिधी डॉ. सुधीर वंजे, बीकेसी जम्बो कोविड समर्पित रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे उपस्थित होते.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रारंभी कोरोना लसीकरणासाठी आयोजित केलेल्या "ड्राय रन " मोहिमेची पाहणी करून संबंधितांकडून आढावा घेतला.
त्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधतांना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर लघुसंदेश प्राप्त झालेली व्यक्ती लसीकरण केंद्रात आल्यानंतर प्रथम त्याचे तापमान मोजण्यात येऊन निर्जंतुकीकरण करण्यात येते.त्यानंतर संबंधित व्यक्तीला निरीक्षण रूममध्ये बसविल्यानंतर त्या ठिकाणी तीन वेळा त्याची ओळख तपासणी घेण्यात येते.बृहन्मुंबई महानगर पालिकेतर्फे लघुसंदेश पाठविलेली व्यक्ती हीच आहे का ? याची शहानिशा याठिकाणी केल्या जात असल्याचे महापौरांनी सांगितले. लसी करणासाठी संबंधीत व्यक्ती याठिकाणी आल्यानंतर लावण्यात आलेले पोस्टर तसेच दाखविण्यात येणार्या पीपीटीद्वारे लसी करणासाठी आलेल्या व्यक्तींच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींच्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे तसेच ती व्यक्ती थोडी जरी घाबरली असली तरी या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेले तज्ञ डॉक्टर,परिचारिका, वॉर्डबॉयद्वारे त्यांना धीर देण्यात येऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक रीत्या मिळू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.तसेच याबाबत कुठेही कमतरता राहू नये,याची दक्षता घेण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.
संबंधित व्यक्तीचे लसीकरण झाल्यानंतर संबंधित व्यक्ती १५ मिनिटे ते अर्धा तासापर्यंत याठिकाणी बसू शकत असल्याचे महापौरांनी सांगितले. लसीकरणानंतर थोडे जरी त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटले तर याठिकाणी आपत्कालीन व्यवस्था म्हणून आपत्कालीन रूम सज्ज ठेवण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच आपत्कालीन स्थितीत आवश्यक असलेली सर्व प्रकारची इंजेक्शन या आपत्कालीन कक्षात उपलब्ध राहणार असल्याचे महापौरांनी निदर्शनास आणून दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आज प्राथमिक स्वरूपात याठिकाणी जरी आपण बघत असलो तरी ज्या - ज्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे कोरोना लसीकरण केंद्र उघडण्यात आली आहे त्या सर्व ठिकाणी याप्रकारची व्यवस्था करण्यात आली असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.कोविडचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नसून ब्रिटनचा जीवघेणा विषाणू लक्षात घेता प्रत्येक मुंबईकर नागरिकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
लसीकरणामुळे आपण या विषाणूशी चांगल्याप्रकारे लढा देण्यास सज्ज राहू असा विश्वासही महापौरांनी यावेळी व्यक्त केला. कोरोना लसीकरणाची बृहन्मुंबई महानगरपालिकेने चांगल्या प्रकारे तयारी केली असून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे व आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे लसीकरणा बाबत ज्याप्रकारे नागरिकांना समजावून सांगत आहे, त्यामुळे लोकांनी मनामध्ये कोणताही संभ्रम न ठेवता लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम