सावित्रीबाईंच्या विचाराने समाजात बदल घडेल - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
- by Reporter
- Jan 04, 2021
- 851 views
मुंबई :भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी खूप त्याग केला. त्यामुळे आज महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. समाजाचा विरोध झुगारून सावित्रीबाईंनी महिलांची पहिली शाळा काढली. सर्व महिलांच्या उद्धारासाठी तसेच त्यांस शिक्षणाचा व जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी केलेल्या त्यागाची सर्व महिलांनी आठवण ठेवावी. त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या विचाराने समाजात निश्चितच बदल घडेल, असे स्पष्ट उदगार शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काढले.
मुंबई काँग्रेस व मुंबई महिला काँग्रेसच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी २०२१ रोजी मुंबई काँग्रेस, राजीव गांधी भवन येथे " महिला शिक्षण दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, महिला अध्यक्षा अजंता यादव, महासचिव स्मिता चौधरी यांच्यासह मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार मूर्तीमध्ये नायर हॉस्पिटलच्या डॉक्टर सारिका पाटील, मुंबई विद्यालय व सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिरच्या माजी मुख्यद्यापीका नूतन विश्वासराव, अग्निश्यामक दलाच्या अधिकारी सुनीता खोत, समाज कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास, माटुंगा स्टेशन मास्टर नीना शांती आणि त्यांच्या महिला अधिकाऱ्यांची टीम यांचा समावेश होता.
याप्रसंगी भाई जगताप म्हणाले की,प्रचंड विरोध असतानाही सावित्रीबाई फुलेंनी आपले काम चालूच ठेवले.त्या नसत्या तर या सावित्रीच्या भगिनी आपणांस दिसल्या नसत्या. त्यांनी समाजाला संकटातून बाहेर काढले. भाजप सरकारकडून समाजावर खूप अन्याय होत आहे, जाती धर्माचे राजकारण केले जाते. याविरुद्ध आपणास रस्त्यावर उतरावे लागेल. यावेळेस चरणसिंग सप्रा यांनी आपले विचार मांडले. सर्व सत्कार मूर्तींनी सत्काराला उत्तर दिले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुरस्कार स्वीकारताना मुंबई विद्यालय व सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिरच्या मा. मुख्यद्यापीका नूतन विश्वासराव, सोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, महिला अध्यक्षा अजंता यादव व इतर मान्यवर

रिपोर्टर