पालिका कर्मचाऱ्यांच्या कोरोना काळातील विशेष भत्त्यावरून प्रशासनाची कोलांटी उडी
- by Reporter
- Jan 04, 2021
- 1078 views
मुलुंड:(शेखर भोसले) कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या ताळेबंदीच्या काळात लोकल सेवा व हॉटेल्स बंद असल्यामुळे बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सेवेतील सर्व कार्यरत कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी व दैनंदिन जेवण, खाणे याकरिता प्रतिदिन प्रति कर्मचारी रु ३०० चा भत्ता दि २१ मार्च २०२१ पर्यंत देण्याचे मुंबई महानगर पालिकेने मान्य केले असतानाही त्या निर्णयाविरोधात पालिका प्रशासनाने कोलांटी उडी मारल्याचे दिसून आले असून हा भत्ता दि ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच देण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे. तश्या आशयाचे एक पत्र दि २९ डिसेंबर रोजी पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने काढल्याने या निर्णयाविरोधात पालिका कामगार, कर्मचारी व अधिकारी वर्गात नाराजी पसरली आहे. या निर्णयाविरोधात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने आधी ठरल्याप्रमाणे मार्च २०२१ पर्यंत सदर भत्ता देण्यात यावा अश्या विनंतीचे एक पत्र आयुक्तांना पाठवले असून हा भत्ता आधी ठरल्या प्रमाणे २१ मार्च २०२१ पर्यंत देण्यात यावा अशी जोरदार मागणी केली आहे.
मुंबई महानगर पालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने दि २३ ऑक्टोबर रोजी दिवाळी सानूग्रह अनुदान व इतर प्रश्नांबाबत पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या दालनात बैठक झाली होती. या बैठकीत कोरोना काळात जीवाची पर्वा न करता मुंबईकरांना सेवा देणाऱ्या कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिवाळी सानूग्रह अनुदानापोटी दरवर्षीपेक्षा दुप्पट बोनस देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्याला अनुसरून सदर कर्मचाऱ्यांना माहे मार्च २०२० पासून २३ मार्च २०२१ पर्यंत रु ३००/- कोविड भत्ता देण्याचे आयुक्तांनी या बैठकीत जाहिर केले होते. तसेच दि ३० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत देखील आयुक्तांनी हा भत्ता मार्च २०२१ पर्यंत देण्याचे मान्य केले होते. परंतु त्यानंतर पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने दि २९ डिसेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात ३०० रुपयाचा हा भत्ता ३१ डिसेंबरपर्यंतच चालू ठेवण्यात येणार आहे, असे जाहीर केल्याने त्याला आक्षेप घेत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि सरचिटणीस सत्यवान जावकर यांनी एक पत्र मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पाठवले असून हा भत्ता मार्च २०२१ पर्यंत देण्यात यावा तसेच पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
दि १५ जून पासून रेल्वे सुरू करण्यात आल्याने, मुंबई व मुंबई बाहेरच्या प्रवाश्यांसाठी बेस्ट व राज्य शासनाच्या बस गाड्याही सुरू करण्यात आल्याने तसेच ५ ऑक्टोबर पासून हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू करण्यात आल्याने पालिका कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीचा व जेवण, खाण्याचा प्रश्न निकाली निघाला असल्याचे कारण देत पालिका प्रशासनाने ३१ डिसेंबर नंतर सदर भत्ता बंद करण्याचे ठरवले आहे.
रिपोर्टर