मुलुंड पूर्वेत धावणाऱ्या बेस्टच्या वातानुकूलित बसचा शुभारंभ

मुलुंड: (शेखर भोसले)मुलुंड पूर्वच्या "ज्येष्ठ स्थानिक नागरिक मंच"ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सोमवार दिनांक ४ जानेवारी पासून बस क्र.३७० नव्या स्वरूपात सुरू झाली आहे.मुलुंड, म्हाडा कॉलनी ते केळकर महाविद्यालय व्हाया स्टेशन अशी वातानुकूलित बस क्र ३७० चा उद्धाटन सोहळा मिठागर रोड येथे जेष्ठ नागरिक मंचाचे सदस्य नामदेव कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. बेस्टचे मुलुंड बस आगाराचे व्यवस्थापक सुनिल भिसे, व. वाहतूक अधिकारी प्रदीप बागायतकर, सूचित कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 

साधरण ४ वर्षापूर्वी मुलुंड पूर्व परिसरात धावणारी ३७० क्रमांकाची बस सेवा बेस्टने बंद केल्यापासून मुलुंड पूर्व मधील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. म्हाडा किंवा मिठागर रोड येथून स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा शिवाय पर्याय उरला नव्हता. त्यामुळे प्रवासासाठी अधिकचा आर्थिक बोजा मुलुंडकरांवर पडत होता. तसेच काही रिक्षा चालकांच्या उर्मट वर्तनामुळे आणि भाडे नाकारण्याच्या वृत्तीमुळे कामावर जाणार्यांचे जेष्ठ नागरिकांचे, महिला वर्गाचे व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत होते. ३७० क्रमांकाची बस सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी "ज्येष्ठ स्थानिक नागरिक मंच"तर्फे २०१७ साला पासून बेस्टच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. तेव्हाचे बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्याशी यासंदर्भात ४ वेळा भेटीगाठी झाल्या. तसेच ज्येष्ठ स्थानिक नागरिक मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी तेव्हाचे बेस्ट कमिटीचे सदस्य, नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांना भेटून ही बससेवा चालू करण्याची विनंती केली व यासाठी मदत करण्याचा आग्रह केला. त्यांच्या विनंतीला मान देवून नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी बेस्ट अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधून यासाठी अथक प्रयत्न केले होते. अखेर बेस्टने ही बससेवा पुन्हा सुरू करण्यास मान्यता देवून ४ जानेवारी पासून सुरू करण्याचे ठरवले व त्याचा रीतसर शुभारंभ करण्यात आला. वातानुकूलित स्वरूपात असणाऱ्या ४ बसेस बेस्टतर्फे या मार्गासाठी देण्यात आल्या असून सुरुवातीला १५ ते २० मिनिटाच्या फरकाने धावणार आहेत व मिठागर रोड ते म्हाडा बस आगाराच्या दरम्यान असणाऱ्या सर्व बस थांब्यावर थांबणार आहे. सकाळी ६-३० वाजता म्हाडा बस आगार येथून पहिली बस तर रात्री ९-४५ केळकर कॉलेज येथून शेवटची बस सुटणार असलेल्या या बसचे तिकीट ६ रुपये असणार आहे. 

या शुभारंभ सोहळ्यासमयी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, स्थानिक नगरसेवक प्रभाकर शिंदे, मा नगरसेवक नंदकुमार वैती, भाजपा वार्ड क्र १०६ च्या अध्यक्षा अस्मिता गोखले, म्हाडा कॉलनी असोसियेशनचे अध्यक्ष रवी नाईक, ज्येष्ठ स्थानिक नागरिक मंचाचे अध्यक्ष विजय साने, सचिव सरिता मुळे, राम चिंदरकर, रमेश आचरेकर, अनंत लाड, किरण आठवले, योगेश मांजरेकर, अनिल सावंत व आजूबाजूच्या सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट