
चित्रपटांचे लाईव्ह शुटींगदर्शन, पर्यटनस्थळांवर क्यूआर कोड फलक, मुंबई फेस्टीव्हल यासह महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीस चालना देण्यासाठी विविध कंपन्या, संस्थांबरोबर सामंजस्य करार- पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे
राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण,विविध सामंजस्य करारांमुळे राज्यातील पर्यटनाला मिळणार चालना
- by Adarsh Maharashtra
- Dec 29, 2020
- 1470 views
मुंबई, दि. 29 : मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आता चित्रपट, टीव्ही मालिका इत्यादींचे प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण (लाईव्ह शुटींग) पाहण्याची तसेच कलाकारांसमवेत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राईम लिमिटेड यांच्यामध्ये पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर त्या ठिकाणांचा इतिहास, वैशिष्ट्ये आदींची माहिती देणारे ऑफलाईन क्यूआर कोडचे फलक लावण्यात येणार असून यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या दी मुंबई फेस्टीव्हलसंदर्भात तसेच राज्यातील खाद्यसंस्कृतीला चालना देणारे सामंजस्य करारही यावेळी करण्यात आले. याशिवाय राज्यात विविध भागात सुरु झालेल्या कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार श्री. दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह सामंजस्य करार करण्यात आलेल्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, कृषी पर्यटन केंद्रचालक उपस्थित होते.
बॉलिवुड हे देशासह जगभरातील पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षणाचा विषय आहे, त्यामुळे लाईव्ह फिल्म शुटिंग बघण्यास मिळणे ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यासाठी खास तयार करण्यात आलेल्या बसचाही यावेळी मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या बसच्या माध्यमातून पर्यटकांना प्रत्यक्ष चित्रपट, टिव्ही मालिका आदींचे चित्रीकरण पहायला मिळणार आहे. याशिवाय मुंबईत यापुर्वी चित्रपटांचे जे शुटींग झाले त्या स्पॉटवर उतरण्यापूर्वी बसमध्ये त्या चित्रपटातल्या त्या स्थळाचा भाग दाखविला जाईल, व नंतर ते लोकेशन दाखविले जाईल. पेडर रोड येथील फिल्म डिव्हिजनचे फिल्म संग्रहालय दाखविले जाईल. तसेच हॉलीवूडमध्ये लॉस अँजेलीस –बेव्हरली हिल्सची टूर केली जाते, त्याप्रमाणे वांद्रे (पश्चिम), जुहू, लोखंडवाला, सातबंगला या भागांमधून प्रमुख सेलिब्रेटी कलाकारांचे बंगले, निवासस्थाने दाखविली जातील. एकंदरीतच संपूर्ण चित्रपटसृष्टी पर्यटनाचा अनुभव (Complete Film Tourism experience) या टूरद्वारे केला जाईल.
राज्यातील खाद्यसंस्कृतीस चालना देण्यासाठी तसेच स्थानिक व घरगुती पदार्थ पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फुड लाईफसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे पर्यटकांना अधिकृत महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ मिळण्यास मदत होणार आहे.
राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती, रस्त्यांना व चौकांना दिलेल्या नावांचा इतिहास यांचा ऑफलाईन क्युआर कोड बनवून पर्यटकांना ती माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच मुंबई फेस्टिवलसाठी एक्सप्लोरबी प्रा. लि. यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईमध्ये 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत या फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.
विविध कृषी पर्यटन केंद्रांचा सन्मान
कृषी पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. श्री. पांडुरंग तावरे यांचे बारामती कृषी व ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण संशोधन विकास केंद्र (पळशीवाडी, ता. बारामती, जि. पुणे), श्रीमती प्रतिभा सानप यांचे सृष्टी ॲग्रो टुरीजम (मिर्जापुर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), श्री. प्रशांत कामत यांचे वनश्री फार्म्स कृषी पर्यटन केंद्र (माडखोल, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), श्री. प्रमोद सावंत यांचे फार्म्स कृषी केंद्र (कुनकेरी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), श्री. भावेश दमनिवाला, डीएस फार्म्स कृषी केंद्र (येरळ, ता. रोहा, जि. रायगड), श्री. जोसे थॉमस कन्नाई, कृषी पर्यटन केंद्र (कन्नाई धारपी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), श्री. भरत महल्ले यांचे मीरा ॲग्री गॅलरी (रेवसा, जिल्हा अमरावती), श्रीमती रेश्मा शरणार्थी, कृषी पर्यटन केंद्र (तांदुळवाडी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) यांना यावेळी नोंदणी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले की, कोरोनानंतरच्या काळात जगभरातील पर्यटकांसाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आणण्यासाठी कटिबद्ध असून राज्याच्या कृषी पर्यटन धोरणाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. कृषी पर्यटनाचा विकास करणे हे ध्येय्य आहे. सामंजस्य करारांमधून मुंबईसह राज्याच्या विविध भागातील पर्यटन, खाद्यसंस्कृती, बॉलीवूड टुरीजम यांना चालना मिळणार आहे. पर्यटनस्थळांवर क्यूआर कोडचा वापर झाल्याने आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा या क्षेत्रात प्रभावी वापर सुरु होत आहे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे म्हणाल्या की, कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटनाला मोठा वाव आहे, त्याअनुषंगाने पर्यटन विभागामार्फत विविध निर्णय घेऊन पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. कृषी पर्यटन धोरण, पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय, आदरातिथ्य क्षेत्रासाठी परवान्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय असे अनेक वर्षे रखडलेले निर्णय मागील वर्षभरात मार्गी लावण्यात आले आहेत. त्याचा राज्यातील पर्यटन विकासाला मोठा लाभ होत आहे. विविध कंपन्या, संस्थांसमवेत झालेले चार सामंजस्य करार आणि कृषी पर्यटन केंद्रांची नोंदणी यातून कोरोनोत्तर काळात राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असेही राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले.
सामंजस्य करारांविषयी अधिक माहिती
खाद्यपदार्थांचा अनुभव (Food Experience) महत्वाचा भाग आहे. सध्या हॉटेलमध्ये कमी ठिकाणी महाराष्ट्रीय खाद्य पदार्थ (Authentic Maharashtra cuisine) मिळतात. याबाबत फुड लाईफसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यामाध्यमातून होम शेफचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक डेस्टिनेशनवर किमान दहा होम शेफ आणि वर्षभरात तीन हजार होम शेफ तयार करण्यात येणार आहेत. एफडीएमार्फत स्वच्छता, हायजिन आदींचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र गाईड कोड - राज्यातील किल्ले, गुंफा, ट्रेकींग साईटस् आदी ठिकाणी माहिती उपलब्ध नसते. काही दुर्गम ठिकाणी इंटरनेटची कनेक्टिव्हीटी नाही, अशा ठिकाणी ऑफलाईन चालणारा क्यूआर कोड असलेला बोर्ड एंट्री पॉईंटजवळ लावला जाईल. इंग्रजी व मराठीत माहिती मोबाईलवर उपलब्ध होईल. केवळ क्यूआर कोड स्कॅन करुन माहिती मिळेल. तसेच ही माहिती ऑडीओ फॉर्ममध्ये सुद्धा मोबाईलवर ऐकता येईल. सध्या 376 ठिकाणी हे क्यूआर कोड असलेले बोर्ड लावण्यात येणार आहेत.
मुंबई फेस्टीवल - मुंबईमध्ये पुन्हा पर्यटनाला सुरुवात करताना हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, मॉल, डे टूर ऑपरेटर्स यांचेबरोबर समन्वय करुन चैतन्य निर्माण करण्याकरिता उपक्रम राबविला जाणार आहे. दि. 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत सवलतीच्या दरामध्ये रिसॉर्ट, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉलमधील काही वस्तु पर्यटकांना उपलब्ध करुन दिल्या जातील. एमटीडीसीसोबत हॉटेल्स व रिसॉर्ट हे सवलतीच्या दरामध्ये मिळणेसाठी समन्वय केला जाणार आहे. मुंबईतील किल्ले, गुंफा आदी ठिकाणी छोटे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
कृषी पर्यटन धोरण - महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला चालना देण्याचा पर्यटन संचालनालयाचा मानस आहे. त्याचबरोबर एमटीडीसीच्या माध्यमातून त्यांना मार्केटिंगसाठी बुकींग सुविधा उपलब्ध करुन दिले जाईल.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम