सावित्रीमाई फुले आणि जिजाऊ यांचा महान जन्मोत्सव दशरात्र म्हणून साजरा करा.

भीम आर्मीचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांचे राज्यातील जनतेला आवाहन.

मुंबई(प्रतिनिधी) विद्येची खरी देवता ज्ञानज्योती माता सावित्रीमाई फुले जर नसत्या तर आज ह्या देशातील आमच्या माय भगिनी आजही चूल आणि मूल करीत घरातच पुरुषसत्तेच्या गुलाम म्हणून राहिल्या असत्या.कोणी इंदिराजी गांधी जन्माला आल्या नसत्या , कोणत्या लताबाई मंगेशकर घराच्या बाहेर पडून कधी गाणं गाऊ शकल्या नसत्या , कल्पना चावला नि सुनीता विल्यम्स ह्या डोंगरावर जाण्यापलीकडे  चंद्रावर-मंगळावर कधीच जाऊ शकल्या नसत्या. ऐश्वर्या राय आणि हेमा मालिनी सारख्या जगतसुंदऱ्या नवऱ्याच्या दासी म्हणून राहिल्या असत्या , कोणी किरण बेदी सारख्या अधिकारी झाल्याच नसत्या आणि बहन मायावती सारख्या कणखर मुख्यमंत्री सुद्धा बनल्या नसत्या.ह्या अश्या करोडो कर्तबगार महिलांना घडविणारी एक ज्ञानज्योती होती , जिने जीर्ण रूढीवाद्यांचा शेणाचा मारा सहन केला , शिव्यांच्या ओव्या सहन केल्या ,पण इथल्या नारीशक्तीला जगण्याचं नवं भान दिलं , बळ दिलं ,स्वाभिमान दिला आणि एक आवाज दिला , हुंकार दिला , ती ज्ञानज्योती म्हणजेच तुमची आमची उद्धारक माय माता सावित्रीमाई फुले ह्या होय. ह्याच विद्येच्या खऱ्या देवतेचा जन्मदिन ३ जानेवारी २०२१ रोजी असून , त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या काळजात कोरलेली वात्सल्यमुर्ती स्वराज्य संस्थापकाची जननी , महाराष्ट्राची स्फूर्तिदायिनी माता जिजाऊ यांचा जन्मदिन १२ जानेवारी २०२१ रोजी असून  महाराष्ट्रातील सर्वच जनतेने आणि विशेषतः आमच्या माय भगिनींनी हे दोन्ही जन्मदिन एका उत्सवासारखे साजरा करण्याचे जाहीर आवाहन भीम आर्मीचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केले आहे.

३ जानेवारी ते १२ जानेवारी ह्या दहा दिवसांत माता सावित्रीमाई फुले आणि माता जिजाऊ यांचा जन्मोत्सव "दशरात्र" म्हणून साजरा करण्याचे आवाहन भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केले आहे.

३ ते १२ जानेवारी ह्या दशरात्री मध्ये रोज एकेक अश्याप्रकारे माता जिजाऊ , माता सावित्रीमाई , माता रमाई , माता अहिल्यामाई माता झलकारीदेवी , माता भिमाई , माता यशोधरा , माता महामाया देवी , सम्राट अशोकमाता शुभ्रांग्नी , माता फातिमा , रखमामाई पाटील , मदर तेरेसा , संत जनाई , ताराराणी यांसारख्या महान मातांचे चरित्र वाचन करून आपल्या घरातील , वसाहतीतील मुलांना ह्या महान मातांच्या महान कार्याची माहिती द्यावी , त्यांच्या त्यागाची , पराक्रमाची माहिती द्यावी , शिकवण द्यावी.रोज रात्री महिलांना एकत्रित करून ज्ञानप्रबोधन करावे , असे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी आवाहन केले आहे.

संबंधित पोस्ट