
नववर्ष साजरा न करण्याचे भीम आर्मीचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांचे जाहीर आवाहन.
- by Reporter
- Dec 28, 2020
- 1407 views
मुंबई(प्रतिनिधी)मोदी सरकारच्या अन्यायी आणि उद्योगपती धार्जिण्या शेतकरी विरोधी कृषी कायद्याविरोधात गेल्या २६ नोव्हेंबर पासून ह्या देशातील करोडो शेतकरी रस्त्यावर उतरून , प्रचंड कडाक्याच्या थंडीत खुल्या आभाळाखाली आपल्या अधिकारांची संवैधानिक लढाई लढत असताना , आणि ह्या आंदोलनात आतापर्यंत सुमारे ४५ च्यावर शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले असताना आम्ही नवीन वर्षाचा आनंदोत्सव कसा साजरा करावा असा आर्त सवाल करीत भीम आर्मीचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी भीम आर्मीच्या भीमसैनिकांना नववर्षाचे स्वागतोत्सव साजरे न करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
उद्योगपती धार्जिणे असणारे कृषी विधेयक रद्द करून एमएसपी च्या संदर्भात मोदी सरकारने हमी द्यावी इतकीच माफक अपेक्षा आमचा अन्नदाता बळीराजा करीत असताना सरकार मात्र ह्या अन्नदात्याला खलिस्तानी , नक्षलवादी ठरवू पहात आहे.ह्या अभूतपूर्व ऐतिहासिक आंदोलनात पाकिस्तान, चीन , कॅनडा सारख्या विदेशी शक्तींचा हात असल्याचा मूर्ख आणि हास्यास्पद दावा सुद्धा सत्तेतील काही लोकांनी केला.इतकेच काय , हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी कडाक्याच्या थंडीत सुद्धा ह्या अन्नदात्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला ,निष्ठुरपणे लाठीहल्ला करण्यात आला , परंतु आमचा बळीराजा जरासुद्धा न डगमगता आपला न्याय अधिकार मागण्यासाठी संघर्षरत असून ह्या देशातील प्रत्येक मानवतावाद्याने ह्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला पाहिजे असे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगून , ह्यावर्षीचे नववर्षानिमित्त कोणीही कोणत्याही प्रकारे आनंदोत्सवाचे कार्यक्रम साजरे न करता आपला पाठिंबा आपल्या अन्नदात्याला असल्याचे सिद्ध करावे.तसेच ह्या नवीन वर्षानिमित्त आमच्या अन्नदात्याला न्याय मिळवून देण्याचा संकल्प आपण करूया , लोकशाही अधिक मजबूत करण्याचा संकल्प आपण करूया तसेच भारतीय संविधानाचे रक्षण करण्याचा दृढसंकल्प आपण सर्वांनी करण्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी जाहीर आवाहन केले आहे.
रिपोर्टर