टी-१ अवनी मृत्यू प्रकरण मुनगंटीवारांना हटविण्याची मनेकांची गांधी मागणी; मनेका गांधींना फक्त वाघांची काळजी, मला मात्र लाेकांचीही काळजी- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार

टी-१ अवनी मृत्यू प्रकरण मुनगंटीवारांना हटविण्याची मनेकांची गांधी मागणी

टी-१,अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गदारोळ होत असतानाच, वाघिणीला ठार मारण्याचे आदेश देणारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पदावरून हटवा, अशी मागणी  केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पांढरकवडा येथे अवनी (टी १) वाघिणीची हत्या करण्यात आली होती. यावरून सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकार, वन खाते आणि वाघिणीची शिकार करणाऱ्यांवर टीकेचा भडीमार सुरू आहे. त्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी वाघिणीच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलं असून, त्यांनी महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. या प्रकरणी वनमंत्री मुनगंटीवार यांना पदावरून हटवण्यात यावं, असं त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितलं आहे. तसंच वनमंत्री मुनगंटीवार आणि वनखात्याविरोधात आपण जनहित याचिका दाखल करणार आहोत, असं वन्यजीव कार्यकर्ते जेरील बनैट यांनी सांगितलं. बनैट यांनी याआधी अवनी वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.



मनेका गांधींना फक्त वाघांची काळजी, मला मात्र लाेकांचीही काळजी- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार

मुंबई - ‘केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना केवळ वाघाची काळजी आहे, मला मात्र वाघांबरोबरच नागरिकांचीसुद्धा काळजी आहे,’ असा टाेला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साेमवारी अापल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांना लगावला. यवतमाळ जिल्ह्यातील कथित नरभक्षक वाघिणीला ठार केल्यानंतर ‘प्राणिप्रेमी’ भाजप नेत्या मनेका गांधी यांनी मुनगंटीवार यांच्यावर कठाेर शब्दांत टीका केली हाेती. त्यावर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ‘नरभक्षक वाघिणीला ठार करण्याचा निर्णय मंत्री किंवा सचिव घेत नाहीत. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शिकेनुसार निर्णय घेतला जातो. पण याची मनेका यांना माहिती नाही. त्यांनी टि्वट करण्यापेक्षा पन्नास पैसे खर्चून मला एक फोन केला असता तर मी ही सर्व माहिती मोफत दिली असती. मनेका गांधी यांचे वन्यप्राण्यांवर प्रेम आहे. माझे वाघावर तर प्रेम आहेच, वाघिणीच्या बच्च्यावरसुद्धा आहे. मनेका या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आहेत. वाघिणीच्या हल्ल्यात मृत महिला आणि बालकांचाही विचार मला करावा लागतो,’ अशा शब्दांत त्यांनी मनेका गांधी यांच्या ‘प्राणिप्रेमा’ची खिल्ली उडवली. मनेका यांच्या टीकेमुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची झाल्याचा दावाही मुनंगटीवार यांनी केला.मनेका यांना नरभक्षक वाघ ठार मारणे चुकीचे वाटते तर त्यांनी वन संरक्षणाचा केंद्रीय कायदा बदलण्यात पुढाकार घेतला पाहिजे.नरभक्षक टी १ (अवनी) वाघिणीला ठार मारण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया कायदेशीर करण्यात आलेल्या होत्या, याचा पुनरुच्चार मुनगंटीवर यांनी केला. मी वन विभागाचा कारभार हाती घेतल्यावर राज्यात २५ वाघ वाढले आहेत. मी अशा राज्याचा वनमंत्री आहे, ज्या राज्यात देशात सर्वाधिक वाघ (२२६) अाहेत. तसेच व्याघ्र संरक्षणासाठी देशात सर्वाधिक रक्कम माझ्या राज्यात खर्च केली जात असल्याचा दावा मुनगंटीवर यांनी केला.









रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट