कोरोना विरूद्ध प्राणाची बाजी लावून लढलेल्या कोरोना योद्यांचा उचित सन्मान करणे हे माझे सौभाग्य-भगतसिंह कोश्यारी,राज्यपाल.
- by Reporter
- Dec 23, 2020
- 812 views
मुंबई : माणसात देव दडलेला आहे.त्याची निष्काम सेवा केली की,ती आपोआप भगवंताला पोहोचते.कोवीड काळात आपण अशीच मानवरूपी भगवंताची सेवा केलीत याचा मला अभिमान वाटतो असे भावोद्गार महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी यांनी नुकतेच येथे काढले. मुंबईतील बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीच्यावतीने राज्यपाल भगतसिंह जी कोश्यारी यांच्या हस्ते, कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी -ज्यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी स्वताचा जीव धोक्यात घालून मदत केली अशा राज्यातील विविध क्षेत्रातील ३४ समाजसेवकांना कोविड योद्धा पुरस्काराने राजभवनातील शानदार समारंभातून गौरविण्यात आले.त्यावेळी महामहिम राज्यपाल कोश्यारी हे बोलत होते.
ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की सुरूवातीला कोरोनाची प्रचंड दहशत होती राज्यात,देशात कोरोना वाढत असताना आरोग्यसेवक,सफाई कामगार, पोलिस सामाजिक कार्यकर्ते,रक्तदाते प्लेटलेट्स दाते, प्लाझ्मा दाते,पत्रकार,विविध विभागातील कर्मचा-यांनी कोवीडशी दोन हात करून एकत्रितपणे लढा दिल्याने कोरोना आता आटोक्यात येऊ लागला असून बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर यांनी सर्वच स्तरातील महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील कोविड योद्यांना निवडून त्यांचा सत्कारसोहोळा आयोजित केला असून या अशा कोविड योद्यांचं कौतुक करणे हे मी माझं सौभाग्य समजतो ,असेही भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी यांच्यासह सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राहूल हजारे तसेच बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर होते.त्याचबरोबर वीर मराठा मावळा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी नांगरे पाटिल,समाजसेविका भारती देशपांडे,भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई अध्यक्ष डॉ.राजू बंडगर तसेच ज्येष्ठ साहित्यिक काशिनाथ माटल आदी मान्यवरही यावेळी विशेष निमंत्रित म्हणून सभागृहात उपस्थित होते.
या कार्यक्रमात बालमोहन विद्यामंदिरच्या कला शिक्षिका संगिता फापाळेताई यांनी महामहिम राज्यपालांचे पुणेरी पगडी परिधान केलेले पोट्रेट समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर आणि बालमोहन विद्यामंदीरचे शिक्षक शशिकांत मुंबरे सर यांनी राज्यपाल कोश्यारीजी यांना यावेळी भेट म्हणून दिली .यावर राज्यपाल महोदयांनी मी प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा अधिक चांगला दाखविला असल्याचे बोलून कलाशिक्षिका संगिता फापाळे यांनी रेखाटलेल्या आपल्या पोट्रेटला मनमोकळी दाद दिली.या संपूर्ण सन्मान सोहोळ्याचे सुंदर सूत्रसंचालन विजय कदम यांनी केले.
रिपोर्टर