गावडे चौकातील ब्रिटिशकालीन तानसा (पूर्व) जलवाहिनीची दुरुस्ती मुदतीच्या १२ तास आधीच पूर्ण, एकूण ५ ठिकाणची गळती बंद

· पाणीपुरवठा सुरळीतपणे व उच्च दाबाने पूर्ववत करण्यात यश

· जलवाहिनीवर २ मॅनहोलही लावले, भविष्यात दुरुस्ती कामे होणार सहजसोपी

· अहोरात्र प्रयत्न करणा-या अधिकारी – कर्मचारी पथकाचे सर्वांकडून कौतुक

मुंबई, दि. ४ : ‘जी - दक्षिण’ विभाग अंतर्गत गावडे चौकात दीपक सिनेमाजवळ ब्रिटिशकालीन व १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) जलवाहिनीची मोठी दुरुस्ती करण्याचे काम जल अभियंता खात्यातील गळती दुरुस्ती पथकाने अहोरात्र प्रयत्न करुन विहित मुदतीच्या १२ तास आधीच पूर्ण केले. अतिशय आव्हानात्मक असे हे काम पार पाडताना एकूण ५ ठिकाणी आढळलेली गळती दुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे आता लाखो लीटर पाण्याची बचत होणार आहे. कौतुक केले आहे.

सदर जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती करताना त्यावर दोन मॅनहोल लावण्यात आले आहेत. परिणामी, यापुढे जलवाहिनी दुरुस्ती करावी लागली तर, मोठे खोदकाम न करता तसेच वाहतुकीस अडथळा न येता या मॅनहोलद्वारे आत जाऊन दुरुस्ती करणे सहजसोपे जाणार आहे. 

सदर दुरुस्तीचे काम हे अत्यंत गुंतागुंतीचे व तुलनेने आव्हानात्मक होते. कारण जमिनी पासून २५ ते ३० फूट  खोलवर व जलवाहिनीच्या आत २५ फूटावर असलेल्या मोठ्या गळतीचे दुरुस्ती करण्याचे खरे आव्हान होते. एरवी या स्वरुपाच्या  कामासाठी कदाचित ६ ते ७ दिवस परिसरातील पाणीपुरवठा बंद करावा लागला असता. मात्र, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, जेसीबी आणि पोकलेन, यांच्या सोबतीला एअर प्लाझ्मा कटिंग मशीनमुळे जलवाहिनीत पाण्याचा प्रवाह सुरु असताना मॅनहोल कापणे शक्य झाले व वेळ वाचला.

सीसीटिव्ही क्राऊलर कॅमेरामुळे जलवाहिनीत आत प्रवेश करुन निरिक्षण करणा-या कर्मचा-यांना सुरक्षितता मिळाली. एअर ब्लोअर संयंत्रामुळे जलवाहिनीच्या आत  हवेचा पुरवठा केला गेला. परिणामी, दुरुस्ती लवकर होण्यास मदत झाली. गळतीच्या कारणाने वाया जाणारे बहुमूल्य असे लाखो लिटर पाणी वाचवण्यात यश तर आलेच, सोबत आता या परिसरातील होणारा पाणीपुरवठा सुरळीत व उच्च दाबाने सुरु झाला आहे.

गावडे चौकात दीपक सिनेमाजवळ या ब्रिटिशकालीन १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) जलवाहिनीला मोठी गळती असल्याचे दिनांक १८ नोव्हेंबर २०२० रोजी निदर्शनास आले होते. तेथे रस्ताही खचला होता. त्यावेळी  सहाय्यक अभियंता (जलकामे) यांनी तातडीने व सतत चार दिवस अथक प्रयत्न करुन जमिनीमध्ये सुमारे २५ ते ३० फूट खोलवर असलेली मोठी गळती बाहेरुन दुरुस्त केली. ही तात्पुरती दुरुस्ती करताना संबंधित विभागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात देखील यश आले. मात्र, जलवाहिनीवर आणखी मोठी गळती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण व मोठ्या दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार दिनांक २ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८ ते दिनांक ३ डिसेंबर २०२० रोजी दुपारी २ या कालावधीत काम हाती घेण्यात आले. मात्र, गळती दुरुस्ती पथकाने दिनांक ३ डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्रीनंतर २ वाजता म्हणजे विहित वेळेच्या १२ तास आधीच दुरुस्ती पूर्ण केली. एकूण ५ ठिकाणी आढळलेली गळती योजनाबद्ध पद्धतीने व कौशल्यपूर्ण रितीने बंद करण्यात आली.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट