व्देषाचे, सोयीचे राजकारण करण्याएैवजी राज्याच्या विकासासाठी प्रयत्न व्हावेत-शिरवडकर

मुंबई(प्रतिनिधी) - भारतातील मुसलमान पाकिस्तानी,शेतकरी खलिस्तानी,सामाजिक कार्यकर्ते शहरी नक्षलवादी, विद्यार्थी संघटना तुकडे तुकडे गँग, वीर जवानांच्या पत्नी तसेच अत्याचार पिडीत महिला बदफैली, असे म्हणत देशात सर्वांना देशद्रोही ठरविले जात आहे व दुफळी माजविण्याचा प्रयत्न करणारेच देशभक्त ठरत आहेत अशी खंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली.

दक्षिण मुंबई शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी "अजान" स्पर्धा घोषित केल्यानंतर सेनेने हिरवा झेंडा खांद्यावर घेण्याचे बाकी ठेवले आहे असे म्हणणाऱ्यांची किव येते. महाराष्ट्रासह भारताची संस्कृती परंपरा सर्व जाती-धर्म-पंथ-देव-ग्रंथ-मंदिर-मस्जिद-चर्च-गुरूव्दारा-बुद्ध विहार,अग्यारी यांना सन्मानाची वागणूक देणारी आहे. तर मग 'अजान' स्पर्धा घेतली म्हणून बिघडले कोठे?सत्तेसाठी राजकारण करीत उपाशी पोटी असलेल्या भक्तांची डोकी भडकविणाऱ्यानी जरा इतिहासाची पाने चाळावित,कित्येक स्वतःला हिंदूत्ववादी म्हणणाऱ्या नेत्यांनी आपल्या मुलींचे निकाह मुसलमानांबरोबर लावले आहेत, ते चालले का?हा लव्ह जिहादचा प्रकार नाही का ?जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती मेहबुबा बरोबर सत्ता स्थापन केली होती ना?भारतातील एका राज्याच्या राजधानीस पाक व्यक्त काश्मिर म्हणणारे चालतात का?

सर्वधर्म समभाव जोपासणाऱ्या,सर्व जाती-धर्माला,आपल्या कुशीत आनंदाने विसावून घेणाऱ्या मुंबईत अधिक सलोखा निर्माण व्हावा म्हणून 'अजान' स्पर्धेचे आयोजन झाले तर.बोंबाबोंब कशाला?मुंबईसह महाराष्ट्रातील जनता शहाणी आहे. येथे फुले-आंबेडकर-शिवाजी महाराज-सावित्रीबाई-शाहूमहाराज यांच्यासारख्या महान विभुतीनी बंधुत्वाची समतेची मोट बांधली आहे, त्या मोटेवर कितीही डोके आपटले तरी ती मोट तुटणार नाही, सुटणारही नाही. देशासाठी प्राणांचे बलिदान देणे,त्याग करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे वीर जवान सीमेवर शहीद होत आहेत.देशभक्त शेतकऱ्यांचे आंदोलन बल प्रयोग करून, साम-दाम-दंड भेदाने खोटे नाटे आरोप करीत चिरडले जात आहे,ही चिंताजनक बाब आहे.असे मत दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले.

तेव्हा विनाकारण व्देषाचे व सत्तेचे राजकारण करण्यात वेळ घालविण्यापेक्षा राज्याच्या विकासासाठी प्रयत्न व्हावेत.देशाची अखंडता, शांतता,एकात्मता, उध्वस्त होऊ नये. युवाशक्ती स्वार्थी सत्तेच्या राजकारणा पायी भरकटली जाऊ नये.असे मतही दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले.

संबंधित पोस्ट