धारावीत भाजपची दलित महिला विरोधी भूमिका

मुंबई (प्रतिनिधी) संपूर्ण देशात भाजपची "बेटी बचाव, बेटी पढाव" भूमिका असताना धारावीत मात्र भाजपची  वेगळीच भूमिका दिसून येत आहे. भाजपचा धारावीचा माजी विधानसभा अध्यक्ष मणी बालन याने ऑक्टोबर 2018 मध्ये भाजपच्याच मुंबईच्या एक दलित महिला पदाधिकारीला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या होत्या, यावरून मणी बालन याच्या विरुद्ध शेकडो दलित महिलांनी धारावी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर त्याच्यावर धारावी पोलीस ठाण्यात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी त्याचा बचाव करीत होते, परंतु धारावीतील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी मुंबई कार्यालयावर धडक मोर्चा काढल्यानंतर त्याला पदावरून काढण्यात आले. सेशन कोर्टात सध्या खटला सुरू आहे आणि सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

परंतु द.म. मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर आणि भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे  दोघेही अशा गुन्हेगाराला पाठीशी घालत आहेत असेच चित्र सध्या दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महिलांचा सन्मान करत असताना भाजपचेच पदाधिकारी अट्रोसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पाठीशी घालत आहेत. यांच्यामागे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर आणि मणी बालन यांची मैत्री कारणीभूत आहे असे धारावीतील भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. राजेश शिरवाडकर यांची एक वर्षांपूर्वी जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा या महिला आणि दलित विरोधी मणी बालनला धारावी भाजप अध्यक्ष बनवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे. तसेच अशा आरोपीला प्रत्येक कार्यक्रमात मंचावर स्थान देऊन त्याचा गौरव करत आहेत. तसेच अशा व्यक्तीला वेळोवेळी सत्कार करून आणि पक्षात सन्मानाचे पद देऊन भाजप काय साधत आहे? यावरून भाजपच्या कथनी आणि करणी यामध्ये फरक आहे असेच दिसत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजपची धारावीतील दलित आणि महिला विरोधी भूमिका अचंबित करणारी आहे. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मैत्रीसमोर धारावीतील महिला आणि दलित समाजाचा सम्मान गौण वाटतो का? भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर यांनी याचे उत्तर दिले पाहिजे.असे धारावीतील भाजपचे कार्यकर्ते खाजगीत बोलत आहेत. शिवाय धारावी तालुका मंडळ अध्यक्ष लवकरात लवकर न निवडल्यास दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यास वेळ लागणार नाही असे भाजप कार्यकर्ते खाजगीत बोलत आहेत.

संबंधित पोस्ट